भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या अपहरणास मदत करणाऱ्या पाकिस्तानी मौलवीची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. बलुचिस्तान प्रांतातील तरबात शहरात शुक्रवारी रात्री हा हल्ला घडला. हत्या झालेल्या मौलवीचे नाव मुफ्ती शाह मीर असून, तो पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयचा निकटवर्तीय होता. शुक्रवारी रात्री मशिदीतून बाहेर पडत असताना, मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. या गोळीबारात शाह मीर जागीच ठार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुफ्ती शाह मीर हा पाकिस्तानातील जमात उलेमा-ए-इस्लाम या कट्टरपंथी संघटनेचा सदस्य होता. तसेच, तो शस्त्रास्त्र व मानवी तस्करीत सक्रिय असल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले. मीर याने पाकिस्तानातील दहशतवादी छावण्यांना भेटी दिल्या होत्या आणि भारताविरोधात दहशतवादी कारवायांना हातभार लावल्याचा आरोप आहे. तो भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्यासाठी आयएसआयसोबत कार्यरत असल्याचे बोलले जाते.
गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानात अनेक कट्टरपंथी आणि दहशतवाद्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हा हल्ला त्याच साखळीतील एक भाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सन २०१६ मध्ये कुलभूषण जाधव यांचे इराण-पाकिस्तान सीमेजवळून अपहरण करण्यात आले होते. पाकिस्तानने त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवला असून, सध्या ते पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. या प्रकरणामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठा राजनैतिक तणाव निर्माण झाला. भारताने वारंवार जाधव यांच्या सुटकेची मागणी केली असली तरी, पाकिस्तानकडून त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.


Leave a Reply