मुंबईच्या विकासाला नवा वेग! मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ब्रूकफील्ड यांचा ऐतिहासिक करार १२ अब्ज डॉलरची थेट परकीय गुंतवणूक

मुंबईच्या शहरी विकासात क्रांतिकारी बदल घडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि जागतिक गुंतवणूक क्षेत्रातील आघाडीची कंपनी ब्रूकफील्ड यांनी ऐतिहासिक सामंजस्य करार केला आहे. या भागीदारीतून तब्बल १२ अब्ज डॉलर (१.०३ लाख कोटी रुपये) थेट परकीय गुंतवणूक करण्यात येणार आहे. या गुंतवणुकीद्वारे मुंबई महानगर प्रदेशाला येत्या ५ ते ७ वर्षांत जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी उद्देश ठेवण्यात आला आहे.
या उपक्रमाचे नेतृत्व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी केले असून, ब्रूकफील्डचे सीईओ अनुज राजन यांच्या उपस्थितीत हा करार साकार झाला. दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने सलग दुसऱ्या वर्षी सहभाग घेतला आणि तब्बल ४० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे करार केले. विशेष म्हणजे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात हा ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे.

या सहयोगाच्या माध्यमातून मुंबईत महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प उभारले जाणार आहेत, ज्यामध्ये
१. मेट्रो प्रकल्प, रस्ते आणि पूल : वाहतूक व्यवस्थेचा विस्तार आणि सुधारणा
२. शहरी पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेट : राहणीमान आणि व्यावसायिक संधींमध्ये वाढ
३. ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट : सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभतेसाठी विकसित प्रकल्प
४. लँड व्हॅल्यू कॅप्चर संधी : पायाभूत सुविधांमुळे वाढणाऱ्या जमिनीच्या किमतीतून महसूल निर्माण
५. ब्लू आणि ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर; जलस्रोत आणि पर्यावरणपूरक विकासावर भर

मुंबई ३.० नव्या शहरी विकास प्रकल्पांची दिशा
या गुंतवणुकीतून मुंबई महानगर प्रदेशातील कर्नाळा-साई-चीरनेर या क्षेत्रांमध्ये प्रस्तावित “मुंबई ३.०” प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच उत्तर आणि दक्षिण भागात विशेष नियोजन क्षेत्रे विकसित केली जातील.

अ) नवे निवासी, व्यावसायिक आणि मिश्र-वापर विकास प्रकल्प
ब) लॉजिस्टिक्स पार्क, डेटा सेंटर्स आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCC)
क) प्रत्यक्ष, डिजिटल आणि सामाजिक पायाभूत सुविधा विकासावर विशेष भर

मुंबई जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र होण्याच्या दिशेने!
हा करार मुंबईच्या विकासाला नवे परिमाण देणारा ठरणार आहे. जागतिक गुंतवणुकीच्या मदतीने शहराचा विस्तार आणि आधुनिकरण वेगाने होईल, वाहतूक आणि पायाभूत सुविधा सुधारतील, तसेच आर्थिक संधी निर्माण होतील. या ऐतिहासिक भागीदारीमुळे मुंबईला जागतिक स्तरावरील आर्थिक केंद्र म्हणून ओळख मिळण्याचा मार्ग अधिक सुकर होईल.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *