२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर हुसैन राणाला भारताच्या ताब्यात देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिली असून, लवकरच त्याला भारतात आणले जाणार आहे. सध्या तो लॉस एंजल्सच्या तुरुंगात आहे. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी डेव्हिड हेडलीशी त्याचे संबंध असल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ‘यूएस कोर्ट ऑफ अपील्स फॉर द नाइन्थ सर्किट’ने प्रत्यार्पण करारानुसार राणाला भारताच्या हवाली करता येईल, असे स्पष्ट केले होते. न्यायाधीश मिलान स्मिथ यांनी सुनावणीदरम्यान सांगितले होते की, राणाने स्वतः कबूल केले की “मुंबईवरील हल्ला योग्य होता.” मात्र, त्याने हा निकाल सर्वोच्च न्यायालयात आव्हानार्थ नेला. हे त्याचे अंतिम अपील होते, कारण यापूर्वी त्याने केलेली सर्व याचिका फेटाळल्या गेल्या होत्या. आता सर्वोच्च न्यायालयानेही त्याचे अपील फेटाळले असून, त्याच्या प्रत्यार्पणाला अंतिम हिरवा कंदील दिला आहे.
कोण आहे तहव्वूर राणा?
तहव्वूर राणाचा जन्म आणि शिक्षण पाकिस्तानात झाले. काही काळ त्याने पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून सेवा दिली. १९९७ मध्ये तो कॅनडाला स्थलांतरित झाला आणि तिथे इमिग्रेशन सेवांमध्ये विशेषज्ञ म्हणून कार्यरत राहिला. शेवटी त्याने कॅनडाचे नागरिकत्व मिळवले. २००९ मध्ये एका डॅनिश वृत्तपत्राने प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल व्यंगचित्र प्रकाशित केले होते, त्याच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ल्याची योजना आखल्याबद्दल शिकागो न्यायालयाने राणाला दोषी ठरवले होते.
२६/११ च्या हल्ल्यातील सहभाग
अटकेनंतर राणाने कबूल केले की लष्कर-ए-तोयबा (एलईटी) ही एक दहशतवादी संघटना आहे आणि त्याचा बालपणीचा मित्र डेव्हिड हेडली याने एलईटीच्या पाकिस्तानमधील प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला होता. अमेरिकन तपास अहवालानुसार, २००५ च्या उत्तरार्धात हेडलीला एलईटीकडून भारतात प्रवास करून गुप्त माहिती संकलित करण्याच्या सूचना मिळाल्या होत्या. २००६ च्या सुरुवातीला हेडली आणि एलईटीच्या इतर दोन सदस्यांनी मिळून मुंबईत इमिग्रेशन कार्यालय उघडण्याबाबत चर्चा केली. हेडलीने राणाला या योजनेची माहिती दिली आणि राणाच्या ‘फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस’ कार्यालयाचा वापर करण्याचा निर्णय घेतला.
हेडलीच्या साक्षीनुसार, तसेच ईमेल आणि इतर पुराव्यांच्या आधारे, राणाने फर्स्ट वर्ल्डशी संबंधित एका व्यक्तीस हेडलीसाठी खोटी कागदपत्रे तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्याने हेडलीला भारताच्या प्रवासासाठी व्हिसा मिळवण्यास मदत केली आणि त्यासाठी आर्थिक सहाय्यही केले. सप्टेंबर २००६ ते डिसेंबर २००६ दरम्यान, राणाने हेडलीला लाखो रुपयांचे सहाय्य केले.
मुंबईवरील हल्ल्यासंदर्भातील माहिती
मार्च २०१६ मध्ये विशेष न्यायालयासमोर उलटतपासणीदरम्यान, हेडलीने कबूल केले की पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या मेजर इक्बाल यांच्या सूचनेनुसार, तो भारतात गुप्त माहिती मिळवण्यासाठी आला होता. हेडलीने भाभा अणु संशोधन केंद्राला भेट दिली होती, आणि राणाला याची संपूर्ण माहिती होती. ताजमहाल पॅलेस हॉटेलवर होणाऱ्या हल्ल्याचीही कल्पना त्याला होती.
राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) राणा हवा असून, त्याच्यावर भारत सरकारविरुद्ध कट रचणे, युद्ध पुकारणे, खोटी कागदपत्रे तयार करणे आणि दहशतवादाला मदत करणे यासारख्या गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल आहेत. आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केल्यामुळे, लवकरच तो भारताच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे.
Leave a Reply