रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी काही महत्त्वाचे नियम जारी केले आहेत. सणाच्या काळात कोणत्याही गैरप्रकारांना आळा बसावा आणि होळी-धूलिवंदनाचा आनंद सुरळीतपणे साजरा व्हावा, यासाठी विशेष आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले की, शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी सणाचा आनंद घेण्याबरोबरच, कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. गेल्या काही वर्षांत होळी-धूलिवंदनादरम्यान पादचार्यांवर रंगीत फुगे फेकणे, महिलांशी अश्लील वर्तन करणे, अश्लील गाणी गाणे, गैरवर्तन करणे असे प्रकार वाढल्याचे दिसून आले होते. यामुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी संयम राखावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गुरुवारी, १३ मार्च रोजी होळी आणि १४ मार्च रोजी धूलिवंदन साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात सात अतिरिक्त पोलीस आयुक्त, 19 पोलीस उपायुक्त, 51 सहाय्यक पोलीस आयुक्त, 1767 पोलीस अधिकारी आणि 9145 पोलीस अंमलदारांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच, महत्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, क्यूआरटी टीम, बीडीडीएस टीम आणि होमगार्डस यांना सज्ज ठेवण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी गस्त, नाकाबंदी, फिक्स पॉईंट बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, महिलांशी गैरवर्तन करणे, बेकायदेशीर मद्य विक्री करणे, तसेच ड्रग्ज सेवन आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, नियमभंग करणाऱ्या आस्थापनांची आणि अभिलेखावरील गुन्हेगारांची विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून सणाचा आनंद घ्यावा आणि शहरातील शांतता राखावी, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Leave a Reply