आता मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य शिक्षण विभागाच्या माध्यमातून कौशल्य विकास अभ्यासक्रम पूर्ण करून क्रेडिट्स मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागाने नुकतेच मुंबई विद्यापीठासोबत एक सामंजस्य करार केला आहे. यामुळे ‘आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र’ द्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्कील-क्रेडिट कोर्सेस उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या विविध कौशल्य अभ्यासक्रमांमधून क्रेडिट्स मिळवून पदवी पूर्ण करण्याचा पर्याय दिला जात आहे.गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारने राज्यातील 1,000 महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ सुरू केली. याचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या नियमित शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत कौशल्याधारित प्रशिक्षण देणे आहे. हा उपक्रम प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असला तरी, १५ ते ४५ वयोगटातील कोणताही इच्छुक व्यक्ती यात सहभागी होऊ शकतो. प्रत्येक मान्यताप्राप्त कौशल्य विकास केंद्रात दरवर्षी १५० विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाईल, तर राज्यभरात दरवर्षी १.५० लाख विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य आहे.
”कौशल्य अभ्यासक्रमांसाठी क्रेडिट्स मिळणार” – मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले, “आत्तापर्यंत या केंद्रांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात मान्यताप्राप्त प्रमाणपत्र दिले जात होते. मात्र, आता या अभ्यासक्रमांसाठी ‘स्कील-क्रेडिट पॉइंट्स’ मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कौशल्य विकसनासाठी आणखी एक प्रोत्साहन मिळेल.” प्रारंभी या संधीचा लाभ २०० हून अधिक महाविद्यालयांना मिळणार आहे, परंतु महाराष्ट्रातील इतर सरकारी विद्यापीठांसोबतही लवकरच अशाच करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक शिक्षणच नव्हे, तर व्यावसायिक कौशल्येही आत्मसात करता येणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी रोजगार आणि स्वावलंबनाच्या नव्या संधी
लोढा पुढे म्हणाले, “नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यवसायिक शिक्षणावर अधिक भर दिला जात आहे. ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बदलत्या रोजगार बाजारपेठेनुसार कौशल्य प्रशिक्षण मिळेल. प्रमोद महाजन स्किल आणि उद्योजकता विकास मिशनच्या मदतीने हा उपक्रम राबवला जात असून, यामुळे विद्यार्थ्यांसाठी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील.”
Leave a Reply