मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर स्थापन करण्यात येणार असून, या अंतर्गत प्राध्यापक आणि संशोधक पदांना मान्यता दिली जाणार आहे. तसेच कलिना संकुलात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दोन वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी केली.
मुंबई विद्यापीठात आयोजित संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. नव्याने स्थापन होणारे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र माता रमाबाई आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र आणि श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या वेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव अमित यादव, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, प्रा. मनिषा करणे, अनिल कुमार पाटील, प्रभात कुमार सिंह यांच्यासह अनेक मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले की, भारतीय संविधान हा एक जिवंत दस्तऐवज आहे आणि तो समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संविधानामुळे नागरिकांना त्यांच्या अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव होते तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनाचा मार्गदर्शक आधारही मिळतो. संविधान अमृत महोत्सव हा स्तुत्य उपक्रम असून, मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्येही अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाची स्थापना होणार
•
Please follow and like us:
Leave a Reply