केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले मुंबईतील बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) मुख्यालय अखेर दिल्लीला स्थलांतरित झाले आहे. मंगळवार, २५ फेब्रुवारीपासून दिल्लीच्या द्वारका (सेक्टर १४) येथील बौद्धिक संपदा भवनात हे मुख्यालय कार्यरत होणार असल्याची अधिकृत अधिसूचना उद्योग संवर्धन आणि व्यापार विभागाने जारी केली आहे.गेल्या ५० वर्षांपासून मुंबईतील अन्टॉप हिल येथून देश-विदेशातील उद्योजकांना पेटंट मंजूर केली जात होती. मात्र, आता केवळ मोजके अधिकारी आणि कर्मचारी मुंबई कार्यालयात कायम ठेवले जात असून, महाव्यवस्थापक दिल्लीत कार्यरत राहणार असल्यामुळे अंतिम प्रमाणपत्र दिल्ली कार्यालयातूनच दिले जाणार आहे.
मुंबईतील पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्क मुख्यालयाच्या नियंत्रणाखाली दिल्ली, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद आणि नागपूर येथील शाखांचे कामकाज पाहिले जात होते. परंतु, मुख्यालय दिल्लीला गेल्यामुळे हा कारभार आता दिल्ली कार्यालयातूनच चालवला जाणार आहे. या निर्णयामुळे मुंबईच्या औद्योगिक महत्त्वावर परिणाम होईल, अशी भावना राज्यातील उद्योजक व्यक्त करत आहेत. गेल्या ५३ वर्षांपासून मुंबई कार्यालयातून पेटंटसंबंधी अंतिम मंजुरी दिली जात होती. नवीन रेकॉर्ड नोंदणी, व्यापार चिन्ह आणि बौद्धिक संपदा प्रक्रिया अद्याप मुंबई कार्यालयातूनच होईल, असे वाणिज्य आणि उद्योग विभागाने स्पष्ट केले असले, तरी महाव्यवस्थापक पद दिल्लीत हलवले गेल्याने मुंबईतील मुख्यालयाची शाखेत रूपांतरण झाले आहे.
पूर्वी मुंबईतील मुख्यालय इतर पाच शहरांतील शाखांवर नियंत्रण ठेवत होते. सर्व शाखांमधील पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुंबईतून अंतिम प्रमाणपत्र जारी केले जात होते. दरवर्षी सुमारे एक लाख पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्कसंबंधी अर्ज येत असत. मात्र, आता या सर्व अर्जांवर अंतिम निर्णय दिल्ली मुख्यालयात घेतला जाईल, ज्यामुळे मुंबईचे महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे. या स्थलांतरामुळे मुंबईतील उद्योग जगतात नाराजी पसरली असून, महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रावर याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मुंबईचे पेटंट मुख्यालय दिल्लीला स्थलांतरित, उद्योगजगताची चिंता वाढली
•
Please follow and like us:
Leave a Reply