मुंबईतील काही उपनगरीय भागांत डासांची संख्या लक्षणीय वाढली असून, त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. विशेषतः आरे कॉलनी आणि गोरेगाव (पूर्व) परिसरात हा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवत आहे. या भागातील रहिवाशांना डासांच्या उपद्रवामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
डासांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने क्युलेक्स प्रजातीच्या डासांमुळे होत असून, हा संपूर्ण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरे कॉलनीजवळ राहणाऱ्या नागरिकांनी डासांचा त्रास असह्य होत असल्याची तक्रार केली आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडजवळील उंच इमारतींमध्ये राहणारे नागरिक डासांपासून बचाव करण्यासाठी खिडक्या सतत बंद ठेवण्यास भाग पडत आहेत.
“डास मारण्यासाठी वारंवार फवारणी होत असली तरीही डासांचा त्रास काही कमी होत नाही. आम्हाला घरातच राहावे लागते आणि सतत मच्छर मारण्याचे उपाय करावे लागतात,” असे गोरेगाव येथील एका रहिवाशाने सांगितले. विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. नाले आणि गटारे स्वच्छ करण्याचे काम, तसेच फॉगिंग आणि कीटकनाशक फवारणी वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या उपाययोजना अद्याप पर्याप्त ठरत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
डास हे फक्त त्रासदायक कीटक नसून, ते मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका आणि वेस्ट नील वाइरस यांसारखे जीवघेणे आजार पसरवू शकतात.
मलेरिया : प्लाझमोडियम परजीवीमुळे होतो. लक्षणे : तीव्र ताप, घाम येणे आणि थंडी वाजणे.
डेंग्यू : एडिस डासांमुळे पसरतो. लक्षणे तीव्र ताप, त्वचेवर पुरळ, अंगदुखी आणि अंतर्गत रक्तस्त्राव.
चिकनगुनिया: सांधेदुखी आणि तापाची तक्रार, जी अनेक महिने टिकू शकते.
झिका विषाणू: गर्भवती महिलांसाठी धोकादायक; नवजात बालकांमध्ये जन्मदोष निर्माण होण्याची शक्यता.
डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात:
१) घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा; साचलेले पाणी काढून टाकावे.
२) पाण्याचे साठे झाकून ठेवावेत आणि भांडी-टाक्यांची नियमित स्वच्छता करावी.
३) नाले, टायर आणि प्लास्टिक कचऱ्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
४) खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवून डासांच्या प्रवेशास प्रतिबंध करावा.
५) लहान मुलांसाठी मच्छरदाणीचा वापर करावा.
६) संध्याकाळच्या वेळी पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत आणि शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
Leave a Reply