मुंबईचा उष्णतेशी संघर्ष ;वाढत्या तापमानावर उपाय कोणते?

मुंबईसारख्या महानगरात अत्याधुनिक बांधकामे, वाढते सिमेंटकरण, हरवत चाललेली हरितक्षेत्रे आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे उष्णतेच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे ही स्थिती अधिकच बिघडत आहे. वृद्ध, लहान मुले आणि दीर्घ आजारांनी त्रस्त व्यक्ती यांना या उष्णतेचा सर्वाधिक फटका बसतो. हवेतील प्रदूषण दिसते, त्याचे स्रोत ओळखता येतात, मात्र उष्णतेची लाट एक ‘निःशब्द घातक’ ठरते, असे पर्यावरणतज्ज्ञ डॉ. नित्यानंदम यांनी स्पष्ट केले.

पर्यावरणतज्ज्ञांच्या मते हरित क्षेत्र वाढवणे आणि जलस्रोत विस्तार करणे हे सर्वाधिक प्रभावी उपाय असू शकतात, पण मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात हे करणे कितपत शक्य आहे, हा प्रश्न आहे. पाण्याच्या टंचाईमुळेही हे उपाय कठीण ठरतात, मात्र पुनर्वापर केलेले सांडपाणी रस्त्यांवर किंवा उद्यानांमध्ये फवारण्यासाठी वापरणे शक्य आहे, असे ते म्हणाले. शहरांमध्ये उष्णतेचे सर्वात मोठे स्रोत ओळखणे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, वाहनांच्या धुरामुळे २०-३०% मानवनिर्मित उष्णता निर्माण होते, जी इमारतींनंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उष्णतेचा स्रोत आहे. उष्णतेवर उपाय म्हणून कमी उष्णता शोषणारी बांधकाम सामग्री वापरणे, घरांची रचना उष्णतारोधक करणे, गच्चीवर आणि भिंतींवर बागायती उभारणे, शहरांमध्ये शेतीला प्रोत्साहन देणे यासारखे उपाय प्रभावी ठरू शकतात. मात्र दीर्घकालीन परिणाम साधण्यासाठी शहरांसाठी योग्य उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे.

डॉ. नित्यानंदम यांच्या मते शहरांमध्ये उष्णतेचा अभ्यास करून ज्या भागांना सर्वाधिक फटका बसतो त्यांचे नकाशीकरण करणे गरजेचे आहे. भूगोलावर आधारित तंत्रज्ञानाद्वारे झाडांची संख्या वाढवणे, शहरी नियोजन सुधारणे आणि तापमान नियंत्रणासाठी प्रभावी धोरणे राबवणे हे दीर्घकालीन उपाय ठरतील. स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष महेश पलावत यांच्या मते मुंबईसारखी शहरे उष्णतेच्या लाटांसाठी अधिक संवेदनशील बनत आहेत.त्यांच्या मते,दोन-तीन मजली इमारतींची अनियंत्रित वाढ आणि शहरीकरणामुळे परिस्थिती आणखी बिकट होत आहे,हरितक्षेत्र नष्ट होणे, भूजल पातळी घटणे आणि काँक्रीटीकरण वाढणे यामुळे उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र होत आहे ,जानेवारी २०२४ हा आतापर्यंतच्या सर्वांत उष्ण जानेवारींपैकी एक होता, त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांतही उष्णतेच्या लाटा आल्या, जे वाढत्या हवामान बदलाचे संकेत आहेत.

एप्रिल २०२३ मध्ये खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्णतेमुळे १४ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर सरकारच्या उष्णता संकटावरील तयारीबाबत मोठी चर्चा झाली. यंदा उष्णतेच्या लाटांसाठी सतर्कतेचा इशारा देत, बृहन्मुंबई महानगरपालिकेने १० मार्च रोजी उष्णतेशी संबंधित धोके कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

संशोधकांच्या मते, मुंबईसह भारतीय शहरे जर दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यात अपयशी ठरली, तर उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये मोठी वाढ होऊ शकते.

सस्टेनेबल फ्युचर्स कोलॅबोरेटिव्हचे अभ्यासक (Sustainable Futures Collaborative) आदित्य वलियाथन पिल्लई यांच्या मते, “जागतिक तापमानवाढीचा वेग पाहता, भारतासारख्या देशांनी त्वरीत उष्णतेशी जुळवून घेण्याच्या उपाययोजना राबवणे अत्यावश्यक आहे. अनेक उपाय हे परिणाम दिसण्यासाठी वर्षानुवर्षे घेतात, त्यामुळे आताच पावले उचलली नाहीत, तर भविष्यात मोठ्या आर्थिक आणि मानवी हानीला तोंड द्यावे लागेल.कॅलिफोर्निया विद्यापीठाचे लुकास झेपेटेलो म्हणतात, जागतिक तापमानवाढीमुळे तापमान आणि आर्द्रतेच्या धोकादायक पातळीची वारंवारता वाढत आहे, त्यामुळे वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर मोठे संकट निर्माण होईल.

मुंबईसाठी आवश्यक उपाय

सस्टेनेबल फ्युचर्स कोलॅबोरेटिव्हने भारतीय शहरांमध्ये उष्णता संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही शिफारशी केल्या आहेत:

संस्थात्मक बदल

a) स्थानिक प्रशासनात Heat Action Plans (HAPs) अधिक मजबूत करणे

b) उष्णता धोका ओळखण्यासाठी शहरांमध्ये तापमान नकाशीकरण करणे

c) राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीचा वापर करून उष्णतेवरील उपाययोजना निधी उपलब्ध करणे

d) शहरांमध्ये मुख्य उष्णता अधिकारी (CHOs) नेमून त्यांना सक्षम अधिकार देणे

तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपाय; उष्णतेशी लढण्यासाठी ऊर्जाक्षम एसी व थंडावा देणाऱ्या तंत्रज्ञानाचा अवलंब,शहर नियोजनामध्ये हवामान बदलाचा विचार करून नव्याने उष्णतेसाठी अनुकूल उपाय विकसित करणे

BMCचे नागरिकांसाठी मार्गदर्शक उपाय काय?

1) भरपूर पाणी प्या, जरी तहान लागत नसेल तरीही

2) ओआरएस, ताक, नारळपाणी, लिंबूपाणी यासारखे द्रव पदार्थ नियमितपणे सेवन करा

3) मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स टाळा, कारण ते शरीरातील पाणी कमी करतात

4) हलक्या रंगाचे, सुती आणि सैलसर कपडे घाला

5) बाहेर पडताना टोपी, गॉगल्स, छत्री आणि योग्य फुटवेअर वापरा

6) सतत स्वतःसोबत पाण्याची बाटली ठेवा

7) उष्णतेच्या लाटांदरम्यान रस्त्यावर काम करणाऱ्यांनी टोपी, छत्री किंवा ओले कापड वापरावे

8) शरीर थंड ठेवण्यासाठी ओल्या कपड्याने चेहरा आणि अंग पुसा

9) पाळीव आणि भटकी जनावरे सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी द्या

10)बंद गाडीत मुले किंवा प्राणी सोडू नका, कारण आतील तापमान वेगाने वाढून उष्णतेमुळे जीवघेणा परिणाम होऊ शकतो

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *