मुंबईतील २०२३ मधील रस्ते अपघातांमध्ये दोन आणि तीनचाकी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांचे सर्वाधिक बळी गेल्याचे अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. विशेषतः, हिट अँड रन अपघातांमुळे मृत्यूचे प्रमाण अजूनही चिंतेची बाब ठरत आहे.
मुंबई वाहतूक पोलीस आणि ‘ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी’ यांच्या संयुक्त अहवालानुसार, २०२३ मध्ये मुंबईत एकूण ३५१ रस्ते अपघात घडले, ज्यामध्ये ३७४ जणांचा मृत्यू झाला. २०१५ पासून अपघातांचे प्रमाण ३९ टक्क्यांनी घटले असले, तरीही हिट अँड रन प्रकरणांमुळे मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणावर कायम आहे. या अपघातांपैकी ३८ टक्के प्रकरणे हिट अँड रन स्वरूपाची असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अहवालानुसार, २०२३ मधील अपघातांमध्ये ४८ टक्के मृत्यू हे दोन आणि तीनचाकी वाहनचालकांचे तर ४० टक्के मृत्यू पादचाऱ्यांचे होते. मृतांमध्ये ८२ टक्के पुरुष होते, तर त्यापैकी ४७ टक्के मृत्यू २० ते ३९ वयोगटातील पुरुषांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना
रस्ते अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी अहवालात काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. यामध्ये –
• मोटारसायकलस्वारांसाठी हेल्मेट आणि वाहनांसाठी सीट बेल्टच्या नियमांची कठोर अंमलबजावणी
• पादचाऱ्यांसाठी अधिक सुरक्षित रस्ते आणि क्रॉसिंग व्यवस्था विकसित करणे
• सायकलस्वार आणि पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गांचे नियोजन
मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि रस्ते अपघातांचे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी या शिफारसी तातडीने लागू करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे. योग्य उपाययोजना न केल्यास रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण भविष्यातही गंभीर राहू शकते.
Leave a Reply