मुंबईतील रस्त्यावरील 10 हजार खाद्यविक्रेत्यांना मिळणार अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे मार्गदर्शन

मुंबई महानगरपालिकेने रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत, अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 10 हजार परवानाधारक विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
महापालिकेच्या वतीने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार, विक्रेत्यांना अन्न सुरक्षा, वैयक्तिक स्वच्छता, विक्रीच्या ठिकाणची स्वच्छता, अन्न शिजवणे आणि साठवणूक यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय, कचरा व्यवस्थापन, अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी, आणि ग्राहकांपर्यंत गुणवत्तापूर्ण अन्न पोहोचवण्यासाठी आवश्यक त्या तंत्रांची माहिती देण्यात येईल.
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रशिक्षण उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “मुंबईकर आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे खाद्य विक्रेत्यांना अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी प्रशिक्षित करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. या प्रशिक्षणामुळे मुंबईकरांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.”
या सामंजस्य करारावर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी महापालिका आयुक्त गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा, FSSAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमलवर्धन राव, तसेच महापालिकेचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महापालिका आणि FSSAI यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षभरात विविध प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येईल. या सत्रांमध्ये परवानाधारक विक्रेत्यांना अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या विविध अंगांची सविस्तर माहिती दिली जाईल. या उपक्रमाचा उद्देश फेरीवाल्यांच्या व्यवसायाला शिस्त लावणे तसेच मुंबईकरांना स्वच्छ, दर्जेदार आणि सुरक्षित अन्न उपलब्ध करून देणे हा आहे

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *