बेस्टच्या आर्थिक अडचणी व प्रलंबित मागण्यांवर उपाययोजना शोधण्यासाठी राणे यांचा पुढाकार बृहन्मुंबई इलेक्ट्रिक आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) सध्या गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. उपक्रमाचे संपूर्ण संचालन सध्या मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक मदतीवर अवलंबून आहे. बेस्टमधील कामगार व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने ते आज (बुधवार) बेस्टचे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांची बेस्ट भवन, कुलाबा येथे भेट घेणार आहेत.
बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. परिवहन विभागातील बसगाड्यांची संख्या घटल्यामुळे प्रवासी सेवा विस्कळीत झाली आहे. विद्युत विभागही सातत्याने तोट्यात असून, एकूणच उपक्रमावर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्यासाठी देखील बेस्टला कर्जाचा आधार घ्यावा लागत आहे. बस वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होत आहे. दुसरीकडे, अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या थकीत हक्काच्या रकमा मिळवण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागत आहे. हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांच्या देयकांचे प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत.
बेस्टच्या पुनरुज्जीवनासाठी आणि सक्षमीकरणासाठी स्वमालकीच्या बस खरेदी, नवीन भरती, तसेच आर्थिक सुधारणा करण्याच्या मागणीसाठी विविध कामगार संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. या पार्श्वभूमीवर खा. नारायण राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. खा. राणे यांच्या समर्थक असलेल्या बेस्ट कामगार संघटनेच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीत कामगारांच्या वेतन अडचणी, सेवा अटी, तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत देयकांबाबत चर्चा होणार आहे. ही बैठक आज बेस्ट भवन, कुलाबा येथे पार पडणार असून, या वेळी बेस्ट कर्मचारी आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे.
Leave a Reply