नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात असलेल्या अनधिकृत सातपीर दर्ग्याचे बांधकाम मंगळवारी (१५ एप्रिल) रात्री नाशिक महानगरपालिकेच्या वतीने हटविण्यात आले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, यावेळी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दर्गा हटविण्याची प्रक्रिया मंगळवारी रात्री ११ वाजता सुरू करण्यात आली. यावेळी दर्ग्याचे ट्रस्टी, मौलवी, काही प्रतिष्ठित नागरिक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. कारवाईपूर्वी धार्मिक विधी पार पाडण्यात आले. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत दर्ग्याचे ट्रस्टी आणि मौलवी यांनी कारवाईस सहकार्य करण्याचे मान्य केले होते.
मात्र, रात्री अनपेक्षितपणे उस्मानिया चौकाकडून आलेल्या जमावाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या वारंवार आवाहनाला दुर्लक्ष करत जमावाने जोरदार दगडफेक केली. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज आणि अश्रुधूराच्या सहाय्याने जमावाला पांगवले. या प्रकरणी आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. या दगडफेकीत ३१ पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून, पोलिसांनी जमावातील ५७ दुचाकी वाहनांची ताबा घेतला आहे.
घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले की, “सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.” दरम्यान, बुधवारी पहाटे ५.३० वाजता महापालिकेने दोन जेसीबीच्या सहाय्याने दर्ग्याचे सुमारे ९० टक्क्यांहून अधिक बांधकाम जमीनदोस्त केले. कारवाईदरम्यान तयार झालेला मलबा तातडीने हटवण्यात आला असून, महापालिकेच्या वाहनांमार्फत तो परिसराबाहेर नेण्यात आला आहे.
सध्या काठे गल्ली परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या भागात तणावपूर्ण शांतता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काठे गल्ली ते भाभानगर दरम्यानची वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. महानगरपालिकेने सुमारे १५ दिवसांपूर्वी सातपीर दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर नोटीस बजावली होती. मात्र, बांधकाम हटविण्यात न आल्यामुळे अखेर न्यायालयाच्या निर्देशांनुसार ही कारवाई राबविण्यात आ ली.
Leave a Reply