परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेच्या सल्लागार समितीच्या बैठकीत सांगितले की, बांगलादेशने मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून आणण्याची विनंती केली आहे, परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. ही भेट बिमस्टेक शिखर संमेलनाच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित आहे. शनिवारी झालेल्या दोन तासांच्या या बैठकीत काही खासदारांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली आणि भारताने यावर कोणती पावले उचलली याची माहिती मागितली. जयशंकर यांनी सांगितले की, ढाकाच्या मते हे हल्ले अल्पसंख्याकांविरोधात नसून राजकीय हेतूने प्रेरित होते. ही एनडीए सरकारच्या सध्याच्या कार्यकाळातील परराष्ट्र विषयक सल्लागार समितीची पहिली बैठक होती. बांगलादेशातील राजकीय अस्थिरता आणि शेख हसीना सरकारवरील दबाव यासंदर्भात खासदारांना माहिती देण्यात आली.
जयशंकर यांनी मालदीवसोबतचे संबंध, म्यानमारमधील अस्थिरता आणि भारतीय नागरिकांना तिथे सायबर घोटाळ्यांमध्ये अडकवले जात असल्याच्या प्रकरणांबाबतही माहिती दिली. तसेच श्रीलंकेशी संबंधित मुद्द्यांवरही चर्चा झाली. पंतप्रधान मोदी पुढील काही आठवड्यांत श्रीलंका दौर्यावर जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयशंकर यांनी पाकिस्तान आणि चीनसोबतच्या संबंधांवर भाष्य टाळले, मात्र लवकरच यावर चर्चा होईल, असे आश्वासन दिले. त्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानच्या नकारात्मक भूमिकेमुळे सध्या सार्क दक्षिण एशियाई क्षेत्रीय सहयोग संगठन (SAARC) निष्क्रिय आहे, त्यामुळे भारत बिमस्टेकला अधिक महत्त्व देत आहे.
पंतप्रधान मोदी २ ते ४ एप्रिलदरम्यान बँकॉकमध्ये होणाऱ्या बिमस्टेक शिखर संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. बांगलादेशने याच संमेलनाच्या साईडलाइनला युनूस आणि मोदी यांच्या भेटीची औपचारिक मागणी केली आहे, मात्र दिल्लीने अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही.या बैठकीला काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल, मनीष तिवारी, मुकुल वासनिक आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या) प्रियंका चतुर्वेदी, यांसारखे विरोधी पक्षांचे नेतेही उपस्थित होते.
Leave a Reply