पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर होते. महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमांत महायुतीतील सर्व आमदारांसोबत संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांच्या सर्व आमदारांची उपस्थिती असूनही मंत्री धनंजय मुंडे अनुपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीवर चर्चा सुरू झाली.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या एक दिवस आधीच धनंजय मुंडे परळीला रवाना झाले होते. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात मंत्री मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लावण्यात आला, तसेच खंडणीतील आरोपी असल्याने त्याच्यावर हत्येचाही गुन्हा दाखल झाला. या प्रकरणावरून कराड समर्थकांनी परळीत आक्रमक आंदोलन केले. टायर जाळणे, टॉवरवर चढणे, पोलिस स्टेशनसमोर ठिय्या देणे अशा प्रकारे आंदोलने झाली. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना तातडीने परळीला जाण्यास सांगितल्याचे समजते.
परळीला गेल्यानंतरही मुंडे यांनी कोणालाही भेट दिल्याची माहिती नाही. ते दिवसभर फार्महाऊसवरच थांबले. दरम्यान, वाल्मिक कराडला बीड कोर्टात हजर करण्यात आले आणि त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर न्यायालय परिसरात कराड समर्थकांनी घोषणाबाजी करत आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे मुंडे परळीत असतानाही परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले.
मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
बीड हत्याकांड प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तपास सुरू असतानाच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह अन्य नेत्यांनी केली आहे. मात्र, पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी त्यांना अभय दिले आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *