पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० मार्च रोजी महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर येणार असून, हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नागपूरमधील विविध ठिकाणी भेट देणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) शुक्रवारी ही अधिकृत माहिती दिली.
मोदी आपल्या दौऱ्यादरम्यान नागपूरच्या रेशिमबाग येथील ‘स्मृती मंदिर’ येथे भेट देतील. येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवलकर (गुरुजी) यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. हिंदू नववर्षाच्या निमित्ताने ते या ऐतिहासिक स्थळी नतमस्तक होतील. पंतप्रधान नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देतील आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील. १९५६ साली याच स्थळी डॉ. आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती.
या दौऱ्यात पंतप्रधान मोदी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नव्या विस्तारित इमारतीच्या कोनशिला पूजन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. हे केंद्र आधुनिक नेत्र उपचार आणि संशोधनासाठी प्रसिद्ध असून, नव्या प्रकल्पांतर्गत येथे २५० खाटांचे रुग्णालय, १४ बाह्यरुग्ण विभाग (OPD), तसेच १४ अत्याधुनिक मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर उभारले जाणार आहेत. या सुविधांमुळे रुग्णांना जागतिक दर्जाचे आणि किफायतशीर नेत्र उपचार मिळणार आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित राहणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, २००७ मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी स्मृती मंदिराला भेट दिली होती. मात्र, पंतप्रधान पदावर असताना मोदी यांचा हा पहिला अधिकृत दौरा आहे. पंतप्रधान मोदी दुपारी १२ वाजता नागपूरच्या ‘सोलर डिफेन्स एंड एअरोस्पेस लिमिटेड’ येथे मानवरहित विमाने (ड्रोन्स) चाचणीसाठी आवश्यक उपकरणे, चाचणी रेंज आणि रनवेचे उद्घाटन करणार आहेत. हा प्रकल्प संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देईल.
छत्तीसगडमध्ये ३३,७०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण व पायाभरणी
छत्तीसगड दौर्यात पंतप्रधान विविध महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये वीज, तेल, वायू, रेल्वे, रस्ते, शिक्षण आणि गृहनिर्माण क्षेत्रातील महत्त्वाचे प्रकल्प समाविष्ट आहेत. देशभरातील वीजपुरवठा सक्षम करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यातील ९,७९० कोटी रुपयांच्या एनटीपीसीच्या सिपत सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट स्टेज-III (१x८०० मेगावॅट) ची पायाभरणी करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या पायाभूत विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. नागपूर आणि बिलासपूरसाठीही हा दौरा ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.
Leave a Reply