कोथरूड परिसरातील उद्योजक लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५, रा. डीपी रस्ता, कोथरूड) यांची बिहारमध्ये खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘झारखंडमधील खाणीत खोदकामासाठी लागणाऱ्या उपकरणांची १०० कोटींची ऑर्डर आहे,’ अशा आमिषाने त्यांना पाटण्यात बोलवून आरोपींनी हा कट रचला होता. पाटणा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आरोपींना अटक केली असली, तरीही या हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.शिंदे हे ‘रत्नदीप कास्टिंग’ या उद्योगाचे संचालक होते. व्यवसायाच्या निमित्ताने ११ मार्च रोजी ते विमानाने पाटण्याकडे रवाना झाले. ‘झारखंडला कामासाठी जात आहे,’ अशी माहिती त्यांनी शेवटच्या वेळेस कुटुंबीयांना दिली होती. त्यानंतर मात्र, त्यांच्या संपर्काचा पूर्णपणे तुटवटा आला.
शिंदे बेपत्ता झाल्यानंतर कोथरूड पोलिसांकडे त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनीही शोधमोहीम सुरु केली आणि पाटणा व गया परिसरात पथक पाठवले. अखेर १४ एप्रिल रोजी बिहारमधील जहानाबाद परिसरात शिंदे यांचा मृतदेह सापडला. प्राथमिक अंदाजानुसार, त्यांची हत्या १२ एप्रिल रोजी झाली असावी, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.हत्येनंतर आरोपींनी शिंदे यांचा मोबाइल वापरून ऑनलाईन व्यवहार केले. तसेच, मोबाइलमधील सर्व डेटा पुसून टाकण्यात आला होता. पाटणा पोलिसांनी वेगवान तपास करत आरोपींना ताब्यात घेतले आहे, मात्र हत्येचं नेमकं कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे.
शिंदे यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले होते. त्यांचे पार्थिवर मंगळवारी सायंकाळी विमानाने आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर कोथरूडमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदे कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी दिली.
Leave a Reply