सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ५१ वर्षीय पुणेकर प्रवाशाने इमिग्रेशन अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे, बँकॉकच्या सहलीची माहिती कुटुंबीयांपासून लपवण्यासाठी त्या व्यक्तीने आपल्या पासपोर्टमधील पाने फाडल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी इमिग्रेशन अधिकारी राजीव रंजन कुमार यांनी तक्रार दाखल केली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, प्रवाशाने जेव्हा बोर्डिंग पास आणि पासपोर्ट सादर केला, तेव्हा तो इंडोनेशियाहून व्हिएतनाममार्गे प्रवास करत आला असल्याचे निदर्शनास आले. मात्र तपशीलवार पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, पासपोर्टमधून काही पाने गायब आहेत.
या संशयावरून अधिक चौकशी केल्यावर त्या व्यक्तीने स्वतःच कबूल केले की, जवळपास एक वर्षांपूर्वी त्याने बँकॉकला केलेला दौरा कुटुंबापासून लपवण्यासाठी ही पाने फाडली होती. हे कृत्य अधिकृत कागदपत्रात बेकायदेशीर हस्तक्षेप मानले जात असल्याने, सहार पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध पासपोर्ट कायद्यानुसार कलम १२ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ३१८(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेतही विमानतळावर धक्का
बुटांमध्ये ‘गोल्डन’ धक्का! ६.३ कोटींचं सोने लपवून आणणारा प्रवासी पकडला
शनिवारी, महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) विमानतळावर आणखी एक कारवाई करत बँकॉकहून आलेल्या प्रवाशाच्या बुटांमध्ये लपवलेलं ६.३ कोटी रुपयांचं तस्करीचं सोने जप्त केलं. या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत अधिकारी त्या प्रवाशावर नजर ठेवून होते.प्रवाशाच्या पादत्राणांची तपासणी केल्यावर त्यामध्ये लपवलेले तब्बल ६.७ किलो सोनं आढळून आलं.यानंतर त्याला अटक करण्यात आली. एवढंच नाही, तर या प्रकरणात सहभागी असलेल्या एका संभाव्य खरेदीदारालाही अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Leave a Reply