पुणे : पुण्यात येरवडा परिसरातील शास्त्रीनगर चौकात दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने भरचौकात लघुशंका केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत शनिवारी (दि. 10) अटक करण्यात आलेल्या दोघांची धिंड काढली.
काय आहे प्रकरण?
येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात गौरव आहुजा (२५, रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) याने दारूच्या नशेत रस्त्याच्या मधोमध आपली लक्झरी कार थांबवून लघुशंका केली होती. त्याच्यासोबत त्याचा मित्र भाग्येश ओसवाल (२५, रा. मार्केट यार्ड) हाही होता. या प्रकाराचा व्हिडिओ काही तासांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेत दोघांविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी शनिवारी दोघांना अटक केली. पुढे या दोघांची शास्त्रीनगर चौकात धिंड काढण्यात आली. या वेळी अनेकांनी हा प्रकार पाहिला आणि त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
न्यायालयीन कारवाई
अटक केल्यानंतर गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवाल यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गौरव आहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली, तर भाग्येश ओसवाल याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पुणे सत्र न्यायालयाने गौरव आहुजाला आणखी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून, भाग्येश ओसवाल न्यायालयीन कोठडीत राहणार आहे.


Leave a Reply