सलग ५१ लावणी गीते सादर करत पुष्पा चौधरी यांनी रचला विश्वविक्रम!

पारंपरिक लावणीला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ऐतिहासिक कामगिरी

पारंपरिक मराठी लावणीला जागतिक स्तरावर मान्यता मिळावी आणि तिचा सन्मान वाढावा, या ध्येयाने प्रेरित होत सुप्रसिद्ध गायिका व अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी एक अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केला आहे. सलग ५१ लावण्या सादर करत त्यांनी जागतिक विक्रम रचला. तब्बल ४ तास ४५ मिनिटे अखंड लावणी गायन करून त्यांनी ही ऐतिहासिक कामगिरी पार पाडली. हा विक्रम पुण्यातील कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न झालेल्या एका विशेष कार्यक्रमात अधिकृतरीत्या नोंदवण्यात आला. वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल या संस्थांचे प्रतिनिधी दिनेश पैठणकर आणि नीता दोंदे टिपणीस यांनी या विक्रमाची नोंद घेतली. या ऐतिहासिक क्षणी पुष्पा चौधरी यांचा प्रमाणपत्र व मेडल देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

 

पुष्पा चौधरी यांनी सकाळी ९:५० वाजता गायनास प्रारंभ केला आणि दुपारी २:४६ वाजता ५१ वी लावणी सादर करत विक्रम पूर्ण केला. पारंपरिक लावणी डिजेच्या गोंगाटात हरवू नये आणि तिचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा विक्रम करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात स्वामिनी अकॅडमी मधील सहगायकांनी कोरससाठी साथ दिली. या ऐतिहासिक सोहळ्यात पुण्यातील प्रसिद्ध वादक हर्षद गणबोटे आणि त्यांच्या संगीत मंडळींनी आपल्या सुरेल वादनाने रंगत आणली. गणबोटे यांनी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्यासोबत १५ वर्षांहून अधिक काळ कार्य केले आहे. तसेच, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना साथ दिलेले कुंभार यांनी अप्रतिम गिटार वादन करत या सोहळ्याला स्वरसंगीताची बहार दिली.

या विशेष कार्यक्रमात पुष्पा चौधरी यांनी “राया तुमची घाई”, “चला जेजुरीला जाऊ”, “तुम्हावर केली मी मर्जी बहाल”, “कळीदार कपूरी पान”, “ढोलकीच्या तालावर”, “बुगडी माझी सांडली गं” यांसारख्या गाजलेल्या आणि लोकप्रिय लावण्या सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. हा ऐतिहासिक लावणी महोत्सव वॅलेंटीना वूमेन्स एम्पॉवरमेंट यांच्या सहकार्याने संपन्न झाला. कलाकार, वादक आणि रसिक प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला. “हा विक्रम केवळ माझा नसून, संपूर्ण लावणीप्रेमींचा आहे,” असे गौरवोद्गार पुष्पा चौधरी यांनी यावेळी काढले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *