कांदिवली पूर्व येथील लोखंडवाला टाउनशिपमधील नागरी समस्यांमुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे धाव घेतली. वाहतूक अडचणी, अपूर्ण पॅराबॉलिक डिव्हायडर, कार्यरत नसलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वैतागलेल्या नागरिकांनी ‘आपण सर्व कनेक्ट’ या नागरिक मंचाच्या पुढाकाराने एक सामूहिक ईमेल मोहिम सुरू केली. १० एप्रिलपासून सुरू झालेल्या या मोहिमेत आतापर्यंत ७५ रहिवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाला ईमेल पाठवत त्यांच्या समस्या मांडल्या. विशेष म्हणजे, तक्रारी केल्यानंतर अवघ्या २४ तासांत ११ एप्रिल रोजी मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्वरित प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
“आम्हाला केवळ स्वयंचलित उत्तराची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात आलेल्या उत्तरात वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना ‘सीसी’ करण्यात आले होते. म्हणजेच हे उत्तर कोणीतरी वैयक्तिकरित्या दिले होते, संगणक-निर्मित नव्हते,” अशी माहिती मंचाचे संस्थापक अध्यक्ष सँटी शेट्टी यांनी दिली. लोखंडवाला टाउनशिपमधील सुमारे २५,००० फ्लॅट्समधील रहिवाशांना गेल्या काही काळापासून नागरी व वाहतूक समस्या भेडसावत आहेत. स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही काहीच बदल न झाल्याने नागरिकांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी थेट संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. या नागरिक मंचात लोखंडवाला व्यतिरिक्त ठाकूर कॉम्प्लेक्स, ठाकूर व्हिलेज आणि रहेजा टाउनशिप (अप्पर गोविंद नगर, मालाड) येथील सदस्यांचाही समावेश आहे.
मिड-डे या वृत्तपत्राने सातत्याने या समस्यांचे वृत्तांकन करून नागरिकांच्या तक्रारींना वाचा फोडली आहे. अपूर्ण दुभाजक, खराब रस्ते आणि वाहतुकीतील अडथळे, विशेषतः अरुंद रस्त्यांमध्ये बेकायदेशीररित्या पार्क केलेली वाहने ही प्रमुख समस्या आहे. तसेच, कार्यरत नसलेले सीसीटीव्ही कॅमेरे, महिला छेडछाड, चोरी आणि इतर किरकोळ गुन्हे यांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. “सीसीटीव्ही नसल्यानं सुरक्षा व्यवस्थेवर परिणाम झाला असून, नागरिक अधिक असुरक्षित वाटत आहेत,” असेही शेट्टी यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिला गेलेला त्वरित प्रतिसाद आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या स्पष्ट सूचना यामुळे रहिवाशांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला आहे. मात्र, या समस्यांवर प्रत्यक्षात किती लवकर आणि प्रभावी उपाययोजना होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Leave a Reply