नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असताना सातारा जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. फलटणमध्ये निंबाळकर घराण्यातील दोन गट पुन्हा एकदा आमने–सामने आले आहेत.
रामराजेंच्या मुलाचा शिवसेनेतून प्रवेश, अध्यक्षपदासाठी मैदानात
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून फलटण नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. रामराजे राष्ट्रवादीत असताना त्यांचा मुलगा शिवसेनेतून उमेदवारी दाखल करणार असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.
भाजपचा धक्का: रणजीतसिंहांच्या भावाला उमेदवारी
दरम्यान, भाजपने नाट्यमय पद्धतीने अंतिम क्षणी मोठा बदल करत समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणजेच माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे मोठे बंधू यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली.
यामुळे दिलीपसिंह भोसले यांची शक्यता शेवटच्या क्षणी बाद करण्यात आली.
फलटणमध्ये पुन्हा घराण्यातील संघर्ष
रामराजे आणि रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वपरिचित आहे. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये मनोमिलन होणार अशी चर्चा होती, परंतु त्या चर्चा फोल ठरल्या. आता त्यांच्या कुटुंबातीलच दोन्ही बाजूंनी उमेदवार रिंगणात उतरल्यानं फलटणमध्ये ‘निंबाळकर विरुद्ध निंबाळकर’ सामना रंगणार हे निश्चित झाले आहे. शिवसेना विरुद्ध भाजप असा सरळ सामना आणि त्यातही एकाच घराण्यातील प्रतिस्पर्धी यामुळे फलटण नगरपालिका निवडणूक अत्यंत रंगतदार होणार आहे.


Leave a Reply