शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्ब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना भांडूप येथील फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या ते वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. राऊत यांच्या आरोग्याची तपासणी डॉक्टरांच्या पथकाकडून सुरू आहे आणि पुढील उपचार त्याच ठिकाणी केले जाणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी स्वतःच्या प्रकृतीविषयी माहिती देत सर्वांना पत्रकाच्या माध्यमातून कळवले होते की, त्यांच्या आरोग्यात काही गंभीर स्वरूपाचा बिघाड झाला आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळणे टाळण्याचे निर्देश दिले आहेत. “मी लवकरच या आजारातून सावरून नववर्षात पुन्हा आपल्या भेटीस येईन,” असे राऊत यांनी त्या पत्रकात नमूद केले होते.
सध्याच्या माहितीनुसार, ते रूटीन तपासणीसाठी फोर्टिस रूग्णालयात दाखल झाले असून आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर ते भांडूप येथील आपल्या ‘मैत्री निवास्थानी’ विश्रांती घेण्यासाठी जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि माध्यमांपासून दूर राहिले आहेत.
संजय राऊत यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. राऊत हे शिवसेना (ठाकरे गटाचे) प्रमुख प्रवक्ते आणि राज्यातील सक्रिय राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या तब्बेतीची बातमी समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.


Leave a Reply