दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी सहकुटुंब भेट घेतली. याभेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. कारण त्यांच्या सुनबाई अर्चना पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश करत अमित देशमुख यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती. यावर सून भाजपमध्ये गेली म्हणजे मी काँग्रेस सोडली असा त्याचा अर्थ होत नाही, चाकूरकर यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर कुजबुज सुरू झाली आहे.
त्यांच्या स्नुषा डॉ.अर्चना पाटील यांनी भेटीचा फोटो सोशल मिडीयावर टाकून ही माहिती दिली. या भेटीवेळी शिवराज पाटील चाकुरकर यांनी लोकसभेचे सभापती असताना केलेल्या नव्या संसद भवनाच्या निर्मितीच्या प्रस्तावाचा पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून उल्लेख केल्याचं अर्चना पाटील यांनी सांगितलं.
भेटीवेळी चाकूरकर यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व चाकूरकर यांचे पुत्र शैलेश पाटील चाकूरकर, भाजपच्या नेत्या व चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, रुद्राली पाटील चाकूरकर, रूषिका पाटील चाकूरकर, कुशाग्र सिंग उपस्थित होते. चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेस पक्षातच आहेत, अशी भावना काँग्रेसमधील नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये आहे. काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी तर ‘देवघरातील देव आमच्यासोबत आहे’, असे विधानसभा निवडणुकीदरम्यान स्पष्ट केले होते. मात्र, शिवराज पाटील चाकूरकर यांनी या सर्व प्रकाराबाबत भाष्य करणे टाळले होते. आता त्यांनी थेट मोदींच्या भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
या भेटीत त्यांच्यासमवेत विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने नवीन संसद भवनाची निर्मिती व व्याप्ती, महिलांचा राजकारणातील सहभाग, सौर ऊर्जा मिशन, वन नेशन वन इलेक्शन, महिला सक्षमीकरण अशा विविध विषयांवर चर्चा झाली. आरटीई मधून दिले जाणारे मोफत प्रवेश दहावीपर्यंत असावेत, अशी मागणी त्यांच्याकडे केली, असे डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी सांगितले.
कोण आहेत शिवराज पाटील-चाकूरकर?
शिवराज विश्वनाथ पाटील हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रामधील वरिष्ठ नेते, भारताचे माजी गृहमंत्री व दहावे लोकसभा सभापती म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. 2010 ते 2015 दरम्यान ते पंजाब राज्याचे राज्यपाल व चंदिगढ केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक होते. 1973 मध्ये लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर प्रथम निवडून आलेल्या पाटील ह्यांनी महाराष्ट्र शासनामध्ये अनेक मंत्रीपदे भुषवली. 1980 मध्ये ते प्रथम लातूर लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले. पुढील सहा निवडणुकांमध्ये त्यांनी येथून विजय मिळवला. 2004 मध्ये राज्यसभेचे सदस्यत्व मिळालेले पाटील 2004 ते 2008 दरम्यान मनमोहन सिंग मंत्रीमंडळामध्ये गृहमंत्रीपदावर होते. 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामधील कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्याच्या टीकेवरून पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
त्यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर यांनीच भाजपमध्ये प्रवेश करत 2024 मध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. काँग्रेसच्या अमित देशमुख यांना कडवी झुंज त्यांनी दिली, मात्र त्यांचा पराभव झाला. निवडणुक प्रचारात आपण सहभागी होणार नाही, सून भाजपमध्ये गेली म्हणजे मी काँग्रेस सोडली असा त्याचा अर्थ होत नाही. मी विरोधात काम करणार नाही, पण भाजपाचा प्रचारही करणार नाही, असे चाकूरकर यांनी स्पष्ट केले होते.
Leave a Reply