पुणे हे भन्नाट शहर आहे आणि पुणेकर हा एकदम वेगळा ‘प्राणी’ आहे. राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि बाळ शिवबा राजे यांच्या हस्तस्पर्शाने सुजलाम -सुफलाम झालेल्या या शहराने, अटक ते कटकपर्यंतचे मराठा साम्राज्य पाहिले आहे , अनुभवले आहे . याच शहरांत महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई यांनी पहिला ‘ज्ञान दिवा’ पेटवला , ज्याचा उजेड अवघ्या देशाला आजही मार्ग दाखवतोय … हे पुणे शहर, गणपतीच्या अकरा दिवसांत ज्या श्रद्धेने जागते, त्याच श्रद्धेने ‘सवाई गंधर्व महोत्सवा’त दाद द्यायला हजर असते. ग्यानबा – तुकारामाचा गजर करत , पंढरपूरच्या वारीला सामोरा जाणारा पुणेकर ‘वसंत व्याख्यानमाले’ची वारीही कधी चुकवत नाही. महाराष्ट्राला विवेकनिष्ठेचे धडे आगरकरांच्या माध्यमातून पुण्यानेच दिले. पुढे डॉ. श्रीराम लागू-डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी हा विवेकनिष्ठ समाज निर्मितीचा लढा पुण्यातूनच चालवला. पुण्याने देशाला स्वातंत्र्याची दिशा दिली. सामाजिक विचार आणि शैक्षणिक प्रगतीचा मार्ग दाखवला. संशोधन आणि विज्ञानाची, उद्योग आणि आधुनिक ज्ञानाची पुण्याने कायम कास धरली. मुख्य म्हणजे आर्थिक आणि भौतिक प्रगती करताना पुणेकरांनी आपले सामाजिक उत्तरदायित्व मनोमन जपले. त्यांच्या त्या प्रामाणिक समाजभानाने पुण्यातील नेत्यांना देशपातळीवर नेले, पण आता ही सारी प्रक्रिया खंडित होत चालली आहे. आधीचे पुणे आता राहिले नाही… आता सगळीकडे उणे उणे होत चाललंय …
पुण्यातील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मिळालेला अल्प प्रतिसाद , हे या बदलत्या पुण्याचे लक्षण आहे का … ?
की आंदोलकांना , बदलते सामाजिक वास्तव लक्षात येत नाही ? असा प्रश्न पडतो .
देशात गाजणारे एव्हढे मोठे तरुणांचे आंदोलन , त्याला फक्त आठशे – नऊशे लोकांचा प्रतिसाद…?
कुणाही पुणेकराला विचारा, तो सांगेल , पुण्याच्या पेठांमध्ये केवळ स्पर्धा परीक्षा देण्यासाठी, राज्यभरातून सत्तर , ऐंशी हजार मुलेमुली येऊन राहताहेत . याशिवाय लाखभर तरुणांनी पुण्यातील विविध महाविद्यालयात प्रवेश घेतलाय . नोकरी धंद्यानिमित्त पुण्यात आलेली तरुणाई असावी किमान चार -सहा लाख , आयटी आणि उच्च विद्याविभूषित युवावर्गाची संख्याही आठ -दहा लाखाच्या वर सहज जाईल … मग तरीही , सोशल मीडियावर गाजलेल्या , दिल्लीत नावाजलेल्या या आंदोलनात इतकी कमी उपस्थिती का ?
दिपके आणि त्यांचे आंदोलन , पुण्यात यशस्वी ठरू नये , यासाठी कुणी घातपात घडवून आणलाय का ?
हे आंदोलन म्हणजे , ‘अवघ्या पंधरा दिवसांचं बाळ’ ही विश्वमभर चौधरी यांची उपमा काय सुचवते , याचा विचार कुणी करणार आहे का ? आणि माझ्यासारख्याने जर खरी परिस्थिती मांडली, तर त्यावर ‘ट्रोल धाड’ पाठवून आवाज बंद करण्याचा प्रयत्न करणार का ?
असो ,
पुण्यातील फक्त आंदोलन आणि त्यातील अल्प उपस्थितीचा मुद्दा नाही, पण त्यातील अभिजित दिपके , सोनंम वांगचुक आदींच्या भाषणांकडे पाहताना असे जाणवते की , त्यांची मांडणी विशेष परिणामकारक झाली नाही . ज्या पुण्यातून लो . टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ‘, अशी गर्जना केली होती . तिथून दिपके यांना देशातील तरुणाईला मोठा राजकीय संदेश देण्याची संधी होती … ज्या शैक्षणिक ‘रिफॉर्म’ साठी दिपके आणि सहकारी आंदोलन करत आहेत , त्या ज्ञान परंपरेचे उद्गाते, घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणास्थान असणाऱ्या , महात्मा फुले आणि सावित्रीमाई यांचे साधे स्मरण देखील दिपके यांना करावेसे वाटू नये , याचे आश्चर्य वाटले …
साधारणतः पुण्यातील पाहुण्यांना, महात्मा फुले घालत तशी किंवा पेशवाई पगडी देण्याचा प्रघात आहे. वांगचूक जर जातील तिथे, त्यांच्या भागातील उपरणे घेऊन जातात, त्याचा गौरवपूर्ण उल्लेख करतात. मग, पुण्यातील आयोजकांनी ही साधी स्वागताची औपचारिक परंपरा देखील पाळू नये… याला काय म्हणावे ?
*आणि म्हणूनच शंका येते की , हे आंदोलन यशस्वी होऊ नये यासाठी, सुरुवातीपासूनच धडपडणाऱ्या ‘काँग्रेसी दुकली’चे दुष्ट मनसुबे यशस्वी झाले की काय…?*
*आणि सन्मा. सोनम वांगचूक यांनी, हे पुण्यातील आंदोलन संपताच, मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी धाव घेऊन, काय सिद्ध केले ?*
आणि सहज मनात आले की , समजा , आज प्रा . हरी नरके सर जिवंत असते , तर हे आंदोलन ‘हायजॅक’ करण्यासाठी घुसलेल्या लोकांना, खरेतर, प्रसिद्धीमत्त सांडाना त्यांनी , हाताला धरून बाहेर काढले असते … पण तसे व्हायचे नव्हते.
म्हणून नरके सर, आज तुमची खूप आठवण आली …
पुण्याचे ‘वैचारिक भूषण’ असणारे हरी नरके, हे केवळ संशोधक नव्हते; ते सामाजिक चळवळींना वैचारिक अधिष्ठान देणारे अभ्यासक होते. फुले-शाहू-आंबेडकर परंपरेतील विचारांना ऐतिहासिक पुरावे, संदर्भ आणि तर्काच्या आधारे मांडणे, ही त्यांची खासियत होती. त्यामुळे ते कोणत्याही आंदोलनात सहभागी झाल्यावर , त्यांची भूमिका केवळ पुढे , पुढे घुसणार्या , घोषणाबाजी करणाऱ्या, चतुर ‘चमको’ कार्यकर्त्याची नसायची तर , समंजस वैचारिक मार्गदर्शकाची असायची … *अभिजित दिपके यांच्या आंदोलनात , हरी नरके सहभागी झाले असते, तर त्यांनी प्रथम त्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या, त्यामागील सामाजिक वास्तव आणि त्याचे संविधानिक परिणाम यांचे विश्लेषण केले असते. आणि त्यांचे महत्व पटवून दिले असते . दुर्दैवाने, कालच्या पुण्यातील दिवसभरातील आंदोलनात तसे कुणी करताना दिसले नाही . *ज्या पुण्याने देशाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून नेतृत्व दिले , वैचारिक पाठबळ पुरवले , त्या पुण्यनगरीतील हे ‘विचार दारिद्रय’ मन अस्वस्थ करून गेलं. त्यातल्यात्यात , भावून गेली एक, नकळत व्यक्त झालेली प्रामाणिक भावना. कॉकरोच जनता पार्टीच्या राजकीय आकांक्षांविषयी पत्रकार दिपके याना प्रश्न विचारत असताना , मध्येच तोंड घालून , विश्वमंभर चौधरी यांनी जोडीने, मोठ्या आवडीने ‘किमान राज्यसभेवर तरी ‘ जाण्याची जी ‘असीम’ इच्छा व्यक्त केली, त्या धाडसाला तोड नाही…*
त्यामुळे खुद्द दिपके सुद्धा ‘चमकून’ गेलेले दिसले…*
त्याक्षणी जर नरके सर असते तर त्यांनी , दिपके याना “भावनिक प्रतिक्रियेपेक्षा बौद्धिक प्रत्युत्तर देण्याचा, मंत्र दिला असता … ” म्हणून , असे वाटते की , नरके सरांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाची वैचारिक पातळी अधिक समृद्ध झाली असती… आणि या आंदोलनात आंबेडकरांच्या सोबत , गांधीजींना जोडण्याचा, दिपके यांच्या प्लॅटफॉर्मवरून , विरोधी पक्षांचा आवाज बुलंद करण्याचा पद्धतशीर ‘काँग्रेसी प्रयत्न’ यशस्वी झाला नसता…
राजकारण म्हंटले की हे चालायचेच !
*एकूणच काय तर , पुण्यात येण्यापूर्वी , अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकार्यांनी , पुण्याचा इतिहास समजून घेतला असता , तर त्यांना पुण्यातील बेरकी लोकांचे कारनामे कळले असते … त्यांचा अंदाज आला असता …*
इ.स. १६३० पासून सुरू झालेल्या मोगली टोळधाडींमुळे पुण्याची वारंवार लुटालूट होत होती. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शहाजी राजे भोसले यांनी छोटया शिवबाला त्याच्या आईसोबत, जिजाऊ माँ साहेबांबरोबर पुण्यात धाडले आणि तेव्हापासून , पुण्याचे पूर्वपुण्य जणू फळाला आले. कसबा पेठेत श्री गणेशा करून जिजाऊंनी पुण्याच्या कसदार मातीत सोन्याचा नांगर फिरवला होता, तेव्हापासून या पुण्यभूमीतून एकाहून एक सरस माणसे पैदा होत गेली. शिवबा राजांनी आपल्या मावळच्या जहागिरीला पार दक्षिणेपर्यंत पोहोचवले. छत्रपतींच्या त्या अफाट पराक्रमाने या पुणे-मावळ परिसरातील मावळ्यांना मैदान मारण्याची जणू चटकच लागली होती. त्यामुळेच मराठय़ांचा भगवा पुढील शंभर वर्षात अटक ते कटकपर्यंत मोठया डौलाने नाचत होता. अठराव्या शतकात आणि एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मराठय़ांचा धाक देशभर होता; पण ५ नोव्हेंबर १८१७ रोजी खडकीच्या लढाईत ब्रिटिशांकडून दुस-या बाजीरावाला हार पत्करावी लागली. परिणामी शनिवार वाडयावर इंग्रजांचा झेंडा, युनियन जॅक फडकला. एकेकाळी पेशवाईचे केंद्र असणारे पुणे अगतिकपणे मुंबई इलाख्याचा भाग म्हणून ओळखले जाऊ लागले. पुण्याची अवघी रया गेली. सरदार-सावकार भुकेकंगाल बनले आणि भल्या मोठया चौसोपी वाडय़ांमध्ये स्मशानशांतता भरली होती, पण या *जीवघेण्या पराभवातूनही पुण्याने आपला कसदार कणखरपणा सोडला नव्हता. आपल्या दु:ख, संकटांचा सामना करण्यासाठी ज्ञानसंपादन करण्याशिवाय अन्य मार्ग नाही, याची सर्वात आधी जाणीव एका पुणेकराला झाली. त्यामधूनच तीन जुलै १८५१ रोजी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची मुलींची शाळा अस्तित्वात आली. या शाळेला बुरसटलेल्या विचारांच्या सनातनी लोकांनी खूप विरोध केला. तरीही तिचे काम वाढतच गेले. त्या वाढत्या कामाची व्यवस्था पाहण्यासाठी पुढे ‘अतिशुद्रादिकास विद्या शिकविण्याविषयी मंडळी’ या नावाची संस्था स्थापन झाली होती. एकीकडे शैक्षणिक उन्नतीशिवाय पर्याय नाही असे गर्जून सांगत असतानाच महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८६३ रोजी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना करून माणुसकीशून्य हिंदू धर्मसंकल्पनांविरोधात एल्गार केला होता.* त्यांच्या जळजळीत लिखाणाने रूढी-परंपरांच्या जाळ्यात अडकलेला हिंदू समाज सावध होऊ लागला होता. अगदी त्याच काळात लोकहितवादी देशमुख या सरदार घराण्यात जन्मलेल्या असामान्य संपादकाने जीवनाच्या र्सवकष विकासासाठी एकहाती लढाई सुरू केली होती. शासकीय सेवेत असूनही आपल्या समाजाच्या विकासासाठी लोकहितवादी अखंडपणे कार्यरत होते. *पेशवाई बुडाल्यानंतर देशभर सत्ता गाजवणा-या मराठय़ांना, पर्यायाने पुणे नगरीला मरगळ आणि अवकळा आलेली असताना फुले-लोकहितवादी या दोन लेखक-संपादकांनी केलेले काम अतुलनीय होते. १८७२ साली न्या. महादेव गोविंद रानडे यांची पुण्यात न्यायाधीश म्हणून बदली झाली आणि फुले लोकहितवादींच्या सामाजिक कार्याचा चोहोअंगाने विस्तार झाला.* एकूणच काय तर पेशवाईत, मराठय़ांच्या परमोत्कर्षाच्या काळात, जे पुणे शहर दिल्लीच्या तोडीचे राजकीय सत्ताकेंद्र बनले होते, त्या शहराचे राजकीय महात्मा संपल्यानंतर फुले-लोकहितवादी-गोखले आदी मंडळींनी पुण्याला ज्ञानप्रसाराचे केंद्र बनवले, त्यामुळे शिक्षणासह राजकारण, अर्थकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती, कला आदी विविधांगी प्रगतीचे धुमारे या शहरास फुटले, महात्मा फुले आणि लोकहितवादी यांचे लिखाण मुख्यत: मराठीतच होते, त्यामुळे आरंभीच्या काळात त्यांचे कार्य महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिले, त्याउलट न्या. रानडे यांनी इंग्रजीतून आपले विचार व्यक्त केल्याने अल्पावधीतच पुणे हे राजकीय-सामाजिक चळवळीचे केंद्र बनले. रानडे यांच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक विचारांनी शिक्षित वर्ग खडबडून जागा झाला. *लोकमान्य टिळकांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘महाराष्ट्र हा थंड गोळा होऊन पडला होता. तेव्हा रावसाहेबांनी रानडय़ांनी त्याला चेतना दिली.’ पेशवाई पडल्यानंतर अवघ्या पन्नास-साठ वर्षात झालेला हा बदल, स्तीमित करणारा होता.* पुण्याला आलेल्या या महत्त्वामुळेच मवाळ, नेमस्त न्या. रानडे यांचे राजकीय विरोधक असूनही लोकमान्य टिळक यांची राष्ट्रीय राजकारणाची वाट सोपी झाली. टिळकांच्या नंतर देशाचे नेतृत्व हाती घेणा-या महात्मा गांधी यांनाही, न्या. रानडे, गोपालकृष्ण गोखले यांचे शिष्यत्व पत्करूनच पुढील वाट चालावी लागली होती. तर असे हे ज्ञानमार्गी पुणे, आजही काही अफलातून लोकांना आपल्या कडी-खांद्यावर घेऊन उभे असलेले दिसते.
पुण्याला सामाजिक वा शैक्षणिक कार्याची भली मोठी परंपरा असली तरी, या शहराचे एकूण व्यक्तिमत्त्व गोंधळात टाकणारे. इथे मुंबईत आवश्यक असणारा झकपक दिखाऊ थाट नसला तरी चालेल, दिल्लीत गरजेची असणारी ‘जी हुजुरी’ची खोटी लीनता नसती तरी फरक पडत नाही. कलकत्त्यात लागणारी हिशेबी चलाखी नसली तरी येथे कुणाचे अडत नाही. तुमच्या वेगळ्या विचारांना, कल्पनांना कडाडून विरोध करणारे माथेफिरू येथे असतात, तद्वत तुम्हाला जीवापाड जपणारे सहकारीही हे शहर देते. ज्ञानदानाचा वसा घेतलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना छळणा-या याच शहराने पुढे ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून लौकिक मिळवला. लोकमान्य टिळकांनी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या उपस्थितीत चहा घेतला म्हणून त्यांना प्रायश्चित्त घ्यायला लावणा-या या शहरात पन्नासेक वर्षानी तोच चहा ‘अमृततुल्य’ ठरला. या पुण्यनगरीत हल्ली मुली पॅन्ट किंवा पंजाबी ड्रेस घालून फिरतात, पण १९३० च्या सुमारास महिलांनी नऊवारी नेसावे की पाचवारी, सकच्छ की विकच्छ, असा ‘शास्त्र’शुद्ध वाद रंगला होता. मुलींचे लग्नाचे वय असो, वा विधवा विवाहाला सामाजिक मान्यता देण्याचा प्रश्न असो, सगळ्याच विषयात चर्चा करायला पुणेकर पुढे. टिळक-आगरकरांमधील वाद पुण्यातील वृत्तपत्रांमध्ये जेवढा रंगला त्याहून जास्त रस्त्यावर गाजला. तीच गोष्ट, छत्रपती शाहू महाराज यांनी उपस्थित केलेल्या वेदोक्त की शास्त्रोक्त प्रकरणाची. या वादाने सबंध महाराष्ट्र ढवळून काढला होता.
या पुण्याने जशी देवांना ‘खुन्या मारुती’ वगैरे सारखी नावे दिली तशी वेगळ्या माणसांनाही दिली. १८७०-९० च्या काळात प्रत्येक सार्वजनिक कामात हौसेने भाग घेणारे , गणेश वासुदेव जोशी नावाचे महत्त्वाचे नेते होते. त्यांना ‘सार्वजनिक काका’ असे नाव पुणेकरच देऊ शकतात. तर अशा या शहराने आपल्या विद्वान पुत्रांच्या जोरावर जेवढी प्रतिष्ठा मिळवली, तेवढीच बदनामीही सहन केली. ज्या नरेंद्र दाभोलकर यांनी आपले अवघे आयुष्य समाज जागृतीसाठी घालवले. त्यांची निर्घृण हत्या याच ‘पुण्यनगरा’त झाली. त्याआधी या शहरात विवेकनिष्ठेचा पुरस्कार करीत जुन्या रूढी-धर्मपरंपरांना आव्हान देणा-या ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर यांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली गेली होती. आणि पुढेतर ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे नामक धर्मवेडयाने महात्मा गांधी यांची निर्घृण हत्या करून पुण्याच्या इभ्रतीला काळिमा फासला होता; परंतु तरीही पुण्यातील समाजसेवकांची कामगिरी इतकी बलवत्तर की, त्या धक्क्यातूनही पुणे शहर बाहेर आले, मात्र मोठा बदल घेऊन…. गांधीजींच्या हत्येनंतर पुण्यातील सत्ताकेंद्र ब्राह्मणेतरांकडे, मराठ्यांकडे सरकले. सत्यशोधक समाज, शेकाप, समाजवादी, कम्युनिस्ट आदी चळवळी पुण्यातच फोफावल्या. काकासाहेब गाडगीळ, सेनापती बापट, शंकरराव देव, केशवराव जेधे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मोहन धारिया, आचार्य अत्रे अशी पुण्यात गाजलेली अनेक नावे घेता येतील. पु. ल. देशपांडे, भीमसेन जोशी, जयंत नारळीकर, सतीश आळेकर, डॉ. जब्बार पटेल, डॉ. विजय भटकर, डॉ. श्रीराम लागू, डॉ. मोहन आगाशे, उद्योगपती शं. वा. किर्लोस्कर, दि. पु. चित्रे, उद्योजक राहुल बजाज, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, आदी सर्वच क्षेत्रांत नाव कमावणा-या लोकांनी पुण्याला आधुनिक काळात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले.
*पण पुण्यातील या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना ‘मोठेपण’ दिले सर्वसामान्य पुणेकरांनी. हे पुण्याचे वेगळेपण कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांना, ठाऊक नसेल , असे मला वाटत नाही . पण त्यांच्या पुण्यातील भाषणात , पत्रकारांशी बोलण्यात , त्याचे फारसे प्रतिबिंब पडलेले दिसले नाही* . तसे घडायला नको होते . कारण , महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या भवितव्याला घडविणा-या बहुतांश संस्था पुण्यात जन्मल्या, त्याही एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात. हे नव्या पिढीने समजून घेतले पाहिजे . आजही त्यातील पुणे सार्वजनिक सभा, पुणे नगर-वाचन मंदिर, वसंत व्याख्यानमाला, वेदशास्त्रोत्तेजक सभा, वत्कृत्वोत्तेजक सभा आदी संस्था कार्यरत असलेल्या दिसतात. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हिंद सेवक समाज, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, भारत इतिहास संशोधन मंडळसारख्या राजकारण आणि संशोधनाला वळण देणा-या संस्था पुण्यातच सुरू झाल्या, कारण या सगळ्या खटाटोपासाठी लागणारे कार्यकर्ते पुण्यात विपुल प्रमाणात होते. महात्मा गांधी म्हणूनच ‘महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे.’ असे म्हणायचे. त्यांच्यापाशी हल्लीच्या कार्यकर्त्यांकडे असणारी ‘हुशारी’ नव्हती, पण प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची समज होती. म्हणूनच ‘हमाल पंचायती’ची कल्पना घेऊन बाबा आढाव कामाला लागले. नशेबाज लोकांना माणसात आणायचे या एकाच ध्येयाने डॉ. अनिल अवचट कार्यरत झाले. पुण्याने आजवर संगीत-नाटक जेवढे आनंदाने पाहिले, ऐकले, तेवढयाच तन्मयतेने पुणेकर गंभीर चर्चासत्रांमध्ये बसतात. सामाजिक कामात उतरतात, म्हणून पुण्यातील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात तरुणाईसह , सर्व वयोगटातील स्त्री -पुरुष सहभागी होतील , अशी अपेक्षा होती … पण तसे होताना दिसले नाही … दिल्ली पाठोपाठ , पुण्यातील दिपके यांच्या आंदोलनात, जे निराशाजनक चित्र दिसले आहे , त्यामुळे, नजीकच्या काळात या तरुणाईच्या आंदोलनाला कुणी गांभीर्याने घेणार नाही … अशी भीती निर्माण झाली आहे.
अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, हे आंदोलन देशाच्या विविध शहरात नेण्याचे ठरवले आहे … पण जर अशी अल्प उपस्थिती असेल आणि तिथे सुद्धा , काँग्रेससह विरोधी पक्षांचा ‘अजेंडा’ राबविणारे लोक , आपला ‘झेंडा’ फडकवू लागले तर , या तरुणाईच्या उद्रेकाला , आणखी एका राजकीय आंदोलनाचे रूप मिळेल आणि ते फार काळ टिकणार नाही … म्हणून , अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, पुण्याच्या कटू अनुभवातून धडा घ्यावा आणि कार्यपद्धतीत बदल करावे , अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.
बाकी निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे….
*महेश म्हात्रे
संपादक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर
MResearch Centre


Leave a Reply