नामवंत वात्रटिकाकार रामदास फुटाणे , म्हणजे आमचे नाना यांचा आज वाढदिवस . वयाच्या ८३व्या वर्षातही , नाना सक्रिय आहेत . तरुणाच्या उमेदीने लिहिताहेत …त्यांनी कायम लिहीत राहावं आणि कविसंमेलने गाजवीत राहावं , तमाम महाराष्ट्राला हसवत आणि हसत शंभरी गाठावी या हार्दिक शुभेच्छा !
माझा नानांचा अनेक वर्षांपासून परिचय आहे . त्यांनी जागतिक मराठी अकादमीच्या माध्यमातून, सुरु केलेल्या “शोध मराठी मनाचा” या कार्यक्रमाशी माझा गेल्या 23 वर्षांपासून मुलाखतकार या नात्याने संबंध आहे . पण, गेल्या मला गेल्या तीन वर्षांपासून, जागतिक मराठी अकादमीच्या संमेलनाच्या निमित्ताने नानांशी एक अनौपचारिक मैत्र जुळलं आणि आयुष्य समृद्ध झालं. व्यासपीठावर अधिकारवाणीने बोलणारे रामदास फुटाणे आणि व्यक्तिगत गप्पांमध्ये नाना रंगाने खुलणारे नाना , अकृत्रिम प्रेमाने खुलवणारे नाना वेगळे आहेत .
त्यांच्या मी आयबीएन लोकमत साठी अनेक मुलाखती घेतल्या आहेत , त्यातून मला कळले की , माझे पत्रकारितेतील आदर्श आचार्य अत्रे यांचा नानांवर देखील खूप प्रभाव आहे .
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे रामदास फुटाणे यांचे जणू दैवतच. अत्र्यांचा बहुआयामीपणा, काव्य लेखन, राजकारण, पत्रकारिता, चित्रपट, हा फुटाणेंना केवळ आकर्षक वाटला नाही, तर तो त्यांनी जगण्याचा एक आदर्श मार्ग मानला. त्यामुळेच फुटाणे एका चौकटीत कधीच अडकले नाहीत. मुळात चित्रकलेचे शिक्षक असलेला हा माणूस, कवितेचा हात धरून वाटचाल करता करता , राजकारण्यांच्या संपर्कात येतो , पुढे राजकारणात रमतो, आमदार होतो , चित्रपटसृष्टीत शिरतो, कविसंमेलने गाजवतो, विविध शासकीय समित्यांवर नेकीने काम करतो आणि या सगळ्या वाटा चालताना प्रत्येक ठिकाणी स्वतःचा वेगळा ठसा उमटवतो.
हे सारं विलक्षण आहे . त्यांच्या व्यक्तिगत गप्पांमधून गिरगावच्या मारवाडी हायस्कुलच्या गोष्टी ऐकताना , आपणही जुन्या काळात फेरी मारून येतो. बर, त्यांची स्मरणशक्ती इतकी अफाट की, बारीक बारीक संदर्भही त्यांच्या हातून सुटत नाहीत . मी चर्चगेट येथील मुंबई विद्यापीठ वसतिगृहात राहिलो असल्याने , मला तेथील घरांच्या किमतींचा अंदाज होता . आम्हा ‘स्त्रग्लर’ विद्यार्थ्यांना , त्याकाळात नाना चर्चगेटला राहतात याचे कितीतरी अप्रूप होते .
त्यांच्या या एकूण जीवन प्रवासात एक प्रकारची ‘धाडसाची सहजता’ दिसते. काहीतरी नवीन करायचे, वेगळे करून पाहायचे, आणि त्यात आपला आवाज स्पष्ट ठेवायचा, हा त्यांचा स्वभाव. ‘सामना’ या चित्रपटाची कथा आणि त्यानंतर निर्माण झालेला प्रभाव हा त्याच वृत्तीचा परिणाम होता. मात्र फुटाणेंची खरी ताकद केवळ चित्रपटापुरती मर्यादित नव्हती; ती त्यांच्या शब्दांत, विनोदात आणि उपरोधात दडलेली होती.
वात्रटिका आणि उपरोध ही त्यांची ओळख कशी बनली, यामागे एक नैसर्गिक घडण आहे. त्यांनी कधीही उपरोधाला कृत्रिम धार दिली नाही; ती त्यांच्या अनुभवांतूनच तीक्ष्ण होत गेली. राजकारण्यांच्या सहवासात राहूनही त्यांनी त्यांच्यावर टीका करण्याची, टोमणे मारण्याची ताकद कायम ठेवली. अनेकदा सत्तेच्या जवळ गेल्यावर शब्द मवाळ होतात, पण फुटाण्यांच्या बाबतीत उलटच घडले. जवळून पाहिल्यामुळेच त्यांच्या निरीक्षणांना अधिक धार आली. नामवंत राजकीय नेत्यांना त्यांच्या तोंडावर त्यांची मस्करी करणारी वात्रटिका ऐकवण्याची ताकद त्यांनी ‘कमावली’ हेच त्यांचे खरे वेगळेपण .
कविसंमेलने हा तर त्यांनी वेगळ्याच पातळीवर नेलेला प्रकार. एकेकाळी मर्यादित श्रोत्यांपुरते असलेले काव्यवाचन त्यांनी रंगतदार, आकर्षक आणि मोठ्या प्रेक्षकवर्गासाठी खुले केले. त्यासाठी महाराष्ट्राच्या गावखेड्यातील , आदिवासी पाड्यातील कसदार कवी शोधून आणणे , महिलांना आग्रह करून बोलावणे , त्यांना दर्जेदार व्यासपीठ मिळवून देणे , हे त्यांचे मोठे काम . मराठवाड्याचे फ. मुं. शिंदे, विदर्भाचे विठ्ठल वाघ, मुंबईचे दया पवार यांच्या साथीने फुटाणे यांनी जवळपास चाळीस वर्षांपूर्वी मराठी कवितेला लोकांच्यात नेण्याचा चंग बांधला
कवितेला ‘ग्लॅमर’ मिळवून देणे म्हणजे तिचा दर्जा कमी करणे नव्हे, तर ती अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे, ही त्यांची भूमिका. विविध स्वभावाचे, भिन्न शैलीचे कवी एकत्र आणणे, त्यांच्यात संवाद निर्माण करणे, आणि त्यातून कार्यक्रमाला एक सजीव लय देणे, हे त्यांनी सहजपणे साध्य केले, त्यामुळे त्यांना ऐकणे हा एक अनुभव असतो .
त्र्याऐंशीच्या घरात पोहचल्यानंतरही त्यांचा उत्साह कमी झालेला नाही, हे विशेष. जातीच्या धडपड्या स्वभावामुळे शरीर थोडे थांबते, पण मन कायम धावत असते, अशी त्यांची स्थिती . कोणालाही हेवा वाटावा अशी , कितीही अडचणी येवोत , प्रकृतीची कुरबुर असो , नानांचे कार्यक्रम, प्रवास, लोकांशी संवाद, हे सगळे सुरूच असतं . साहित्य क्षेत्रासाठी काहीतरी सकारात्मक घडवायचे, नव्या पिढीला व्यासपीठ द्यायचे, आणि मराठी संस्कृतीला व्यापक स्तरावर नेायचे, हा त्यांचा ध्यास अजूनही तितकाच तीव्र आहे. जागतिक मराठी अकादमीसारख्या उपक्रमांमधून ते आपल्या संबंधांचा उपयोग केवळ प्रतिष्ठेसाठी नव्हे, तर समाजासाठी कसा करतात हे मी जवळून पाहिले आहे, अनुभवले आहे .
“भारत कधी कधी माझा देश आहे” असे ते म्हणतात, तेव्हा त्यात उपरोध आहे, पण तितकीच वेदनाही आहे. या वाक्यामागे त्यांच्या आयुष्यभराच्या निरीक्षणांचा साठा आहे. देश, समाज, राजकारण यांचे जवळून केलेले दर्शन. पण हे सांगताना ते कटू होत नाहीत; उलट त्या आठवणींमध्ये ते हरवून जातात. जामखेडसारख्या दुष्काळी गावातले बालपण, छोट्या कापड दुकानात बसून लोकांशी गप्पा मारणे, आठवडी बाजारात ग्राहकांना पटवणे, या सगळ्या अनुभवांनी त्यांची संवादकला घडवली. गावातली भजने, तमाशा, सोंगाड्यांचा विनोद, यातून त्यांना शब्दांची लय आणि विनोदाची टायमिंग मिळाली. खंडू खेडकर सारखे नट, वैद्य मास्तरांची बोलण्याची शैली, भाऊ-बापू नारायणगावकरांच्या तमाशातील रंगत, या सगळ्यांनी त्यांच्या मनावर खोल ठसे उमटवले. विठाबाईचे नृत्य, काशिनाथ आणि शंकर यांची संवादफेक, हे त्यांच्या बालपणातील ‘लाइव्ह स्कूल’च होते.
दुसरीकडे अत्र्यांचे ‘नवयुग’ साप्ताहिक, त्यातील व्यंगचित्रे, दत्तू बांदेकरांचे लिखाण, यातून त्यांना बौद्धिक धार मिळाली. चित्रकलेची आवड, मासिके वाचण्याची सवय, दीनानाथ दलाल आणि एस. एम. पंडित यांच्या चित्रांचे आकर्षण, या सगळ्यांनी त्यांच्या सर्जनशीलतेला वेगवेगळे पैलू दिले. आणि मग ‘मी कसा झालो’ हे अत्र्यांचे पुस्तक. एका माणसाने, एका आयुष्यात इतकी विविध रूपे कशी धारण केली असतील , या प्रश्नाने आणि विश्वरूप दर्शनाने ते स्तिमित झाले. तिथूनच त्यांनी ठरवले असावे की ,एकाच मार्गावर चालायचे नाही, तर अनेक वाटा अनुभवायच्या.
म्हणूनच रामदास फुटाणे हे केवळ कवी नाहीत, केवळ व्यंगचित्रकार नाहीत, केवळ चित्रपटकारही नाहीत, ते एक सतत स्वतःला बदलत राहणारे, नवीन अनुभव शोधणारे, आणि त्या अनुभवांना शब्दांची, विनोदाची आणि उपरोधाची धार देणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या आयुष्याची गंमत अशी की ते स्वतःच एक ‘कविसंमेलन’ आहेत…जिथे अनेक आवाज, अनेक रंग आणि अनेक छटा एकाच वेळी जिवंत असतात… अशा या प्रतिभावंत कविवर्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
महेश म्हात्रे
संपादक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर


Leave a Reply