शालेय पुस्तकांमधून कोरी पानं हद्दपार; सरकारचा मोठा निर्णय!

विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी सरकारने राबवलेला प्रयोग अयशस्वी ठरल्याने पाठ्यपुस्तकांमधील कोरी पानं हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने नव्या आदेशानुसार इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोऱ्या पानांशिवाय पाठ्यपुस्तकं उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. हा बदल २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे.
२०२३ मध्ये सरकारने निर्णय घेतला होता की प्रत्येक धड्यानंतर कोरी पानं दिली जातील, जेणेकरून विद्यार्थी महत्त्वाच्या नोंदी वहीऐवजी पुस्तकातच करू शकतील. मात्र, या पानांचा वापर अपेक्षेप्रमाणे झालाच नाही, उलट विद्यार्थी पुस्तकांसोबत वह्या नेण्यासही सुरुवात झाली, त्यामुळे दप्तराचं वजन कमी होण्याऐवजी वाढलं. बालभारतीच्या पाहणीतही ही योजना अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले. तसेच, पुस्तकांच्या छपाईचा अतिरिक्त खर्च सरकारवर मोठ्या प्रमाणात पडत असल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
फक्त कोरी पानं हटवण्याचाच निर्णय नाही, तर ‘एक राज्य, एक गणवेश’ ही योजना देखील मागे घेण्यात आली आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची जबाबदारी पुन्हा शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवण्यात आली असून, केंद्र सरकारनं यासाठी दिलेली रक्कम थेट समितीच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवरील आर्थिक ताण काहीसा हलका होईल, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तक आणि वह्यांचा वापर करता येईल. शालेय शिक्षण विभागाने या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *