चंदीगड १९८४ मधील शीखविरोधी दंगलीदरम्यान झालेल्या दोन हत्यांच्या प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निर्णयानंतर पंजाबच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शिरोमणी अकाली दल (एसएडी) आणि भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी काँग्रेसच्या पंजाब नेतृत्वाला या निर्णयावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. “या निर्घृण गुन्ह्यासाठी मृत्युदंडाची अपेक्षा होती, तरीही आम्ही दिल्ली न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. ४० वर्षांनंतर आलेल्या या निर्णयाने हे स्पष्ट होते की सत्य आणि न्यायाला वेळ लागतो, पण तो नक्की मिळतो,” असे बादल यांनी म्हटले.
तसेच, त्यांनी या संपूर्ण हत्याकांडामध्ये काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “कुमार आणि इतर आरोपींना संरक्षण देणाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, भाजपने या निर्णयाचे श्रेय केंद्र सरकारला देत आपल्या ‘शीख समर्थक’ प्रतिमेवर भर दिला आहे. पंजाब भाजपचे प्रवक्ते प्रितपाल सिंग बलियावाल म्हणाले, “४० वर्षांनंतर शिखांना न्याय मिळाला आहे. काँग्रेसच्या काळात हा खटला दडपून ठेवण्यात आला होता. परंतु मोदी सरकारने विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करून हा तपास पुन्हा सुरू केला आणि न्याय मिळवून दिला.”
दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सरचिटणीस जगदीप सिंग कालोन यांनीही या निर्णयाचे स्वागत करत म्हटले, “हा खटला अनेक वेळा पुन्हा उघडण्यात आला, पण अखेर आज न्याय मिळाल्याचे समाधान आहे. जसवंत सिंग आणि तरुणदीप सिंग यांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या दोषींना शिक्षा झाली आहे.”
या निर्णयामुळे काँग्रेस अडचणीत आली असून आता पक्षाकडून या प्रकरणावर कोणते स्पष्टीकरण दिले जाते, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply