स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी लोकसभेत संताप व्यक्त केला. समाजात तणाव निर्माण करणाऱ्या आणि द्वेषभाषेला प्रोत्साहन देणाऱ्या स्टँड-अप कॉमेडी प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली.
धैर्यशील माने म्हणाले की, काही जण स्टँड-अप कॉमेडियनच्या माध्यमातून आपला राजकीय अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभेत अर्थ विधेयक 2025 वर चर्चेदरम्यान त्यांनी स्पष्ट केले की, कॉमेडियनना धोरणांवर टीका करण्याची मोकळीक असावी, मात्र वैयक्तिक स्तरावर टीका करण्याची परवानगी नसावी.
कामरांचे नाव न घेता माने म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून टीव्हीवर लोकांनी पाहिले असेल, एक विदुषक, ज्याच्या मेंदूत काहीच नाही, तो शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बेजबाबदार वक्तव्य करत आहे. समाजात तणाव निर्माण करणाऱ्या आणि द्वेषाचे वातावरण तयार करणाऱ्या अशा प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालावी, अशी ठाम मागणी त्यांनी लोकसभेत केली. कुणाल कामरा यांनी आपल्या स्टँड-अप शोमध्ये हिंदी चित्रपट ‘दिल तो पागल’ है मधील एका गाण्याचे विडंबन सादर करत शिंदेंना “गद्दार” (बंडखोर) संबोधले. त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीवरही टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रविवारी रात्री मुंबईतील खार येथे असलेल्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये कामरांचा शो झाला. त्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी या क्लबवर आणि त्याच हॉटेलवर हल्ला केला. मात्र, कामराने आपली भूमिका ठाम ठेवत शिंदे यांच्यावरील टीकेबाबत माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला.
यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, एखाद्याविरोधात बोलण्यासाठी ‘सुपारी’ घेतल्यासारखा हा प्रकार आहे. विनोद करण्यालाही एक मर्यादा असावी. अन्यथा, क्रियेला नेहमीच प्रतिक्रिया मिळते. शिंदे पुढे म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नक्कीच आहे, पण त्यालाही काही मर्यादा असाव्यात.
Leave a Reply