राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात एका तरुणाने स्वतःवर होळीचे रंग लावू न देण्याचा प्रयत्न केला असता, तिघा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, २५ वर्षीय हा तरुण जखमी झाला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तिघांपैकी एक आरोपी बबलू मीना याला अटक केली आहे. हा हल्ला लालसोटजवळील रेलवास गावात बुधवारी, म्हणजे होळीच्या दोन दिवस आधी, घडला.
या घटनेचा व्हिडीओ गुरुवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. रामगढ पचवारा पोलिस ठाण्याचे प्रभारी रामशरण गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजनुसार, आता मृत असलेल्या हंसराज मीना या तरुणावर रंग लावण्यावरून वाद झाला होता. हा वाद तो स्थानिक ग्रंथालयात पटवारी परीक्षेची तयारी करत असताना सुरू झाला.
लालसोटचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिनेश अग्रवाल यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी ४ वाजता ग्रंथालयात विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले आणि त्यात हंसराज मीना गंभीर जखमी झाला. त्याला लालसोट रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, असे पोलिसांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन आरोपींनी हंसराजवर हल्ला करत असल्याचे स्पष्ट दिसते, असे अग्रवाल यांनी सांगितले. या तिघांची ओळख अशोक, कालू आणि बबलू अशी पटली आहे.या घटनेनंतर गावकऱ्यांनी मोठा आक्रोश व्यक्त केला. गावकऱ्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले आणि मृतदेह रस्त्यावर ठेवत महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले, अशी माहिती गुर्जर यांनी दिली.


Leave a Reply