कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक (DGP) ओमप्रकाश यांच्या खून प्रकरणाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. विशेष म्हणजे, या खुनाचा आरोप त्यांच्या पत्नी पल्लवी यांच्यावरच करण्यात आला आहे. कौटुंबिक वाद, संपत्तीचे वाद, मानसिक छळ आणि पतीच्या अनैतिक संबंधांनी ही हत्या घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शनिवारी ओमप्रकाश आणि त्यांच्या पत्नी पल्लवी यांच्यात घरगुती वाद झाला. रागाच्या भरात ओमप्रकाश घर सोडून आपल्या घटस्फोटित बहिणीकडे गेले, जी एका खासगी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. दुसऱ्या दिवशी, त्यांच्या मुलीच्या मध्यस्थीने ते पुन्हा घरी परतले. मात्र पुन्हा वाद उफाळून आला आणि त्याच वेळी पल्लवीने ओमप्रकाश यांच्या छाती, पोट आणि हातांवर धारदार शस्त्राने ८ ते १० वार केले.
घटनेनंतर ओमप्रकाश जवळपास २० मिनिटे रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होते. यावेळी पल्लवी आणि त्यांची मुलगी घटनास्थळी उपस्थित होत्या. मृत्यूनंतर पल्लवीने पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. याआधी तिने दुसऱ्या माजी डीजीपीच्या पत्नीला व्हिडीओ कॉल करून, “राक्षसाला कायमचं संपवलं,” असे म्हटले होते.
ओमप्रकाश यांच्याकडे बंगळुरू व दांडेली येथे मोठ्या प्रमाणावर संपत्ती होती. काही मालमत्ता त्यांच्या पत्नी व मुलीच्या नावावरही होती. तरीही घरगुती वाद वाढतच चालले होते. पल्लवीने आयपीएस अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या व्हॉट्सअॅप गटावर लिहिले की, “पती आम्हाला अपमानित करत होते आणि बंदूक दाखवून धमकी देत होते.”
ओमप्रकाश यांच्या मुलाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत आई पल्लवी आणि बहिणीवर थेट आरोप केला आहे. त्यानुसार, गेल्या काही काळात त्यांनी ओमप्रकाश यांचा मानसिक छळ केला होता. त्यामुळेच ते बहिणीकडे जाऊन राहत होते. कार्तिकेश हा त्यांचा मुलगा हत्येच्या वेळी गोल्फ क्लबमध्ये होता व शेजाऱ्यांनी दिलेल्या फोननंतर तो घरी परतला. पोलीस तपासात असे उघड झाले आहे की, ओमप्रकाश यांचे काही महिलांशी अनैतिक संबंध होते आणि त्यांच्या फार्महाऊसवर खासगी पार्टीज घेतल्या जात होत्या. त्यामुळे घरात सतत वाद होत असत. पल्लवीने याची कबुली व्हॉट्सअॅप संदेशांद्वारे दिली होती.
पल्लवीने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ओमप्रकाश यांनी तिच्यावर बंदूक रोखली होती. त्यामुळे गोळी झाडली जाईल या भीतीने तिने स्वतःचा बचाव करण्यासाठी बॉटलने हल्ला केला आणि नंतर चाकूने वार केले. ही हत्या केवळ कौटुंबिक वादापुरती मर्यादित नाही, तर त्यामागे संपत्ती, संशयास्पद संबंध, मानसिक छळ आणि वैयक्तिक कुरबुरींचा गुंता आहे. पोलिस तपास सुरू असून, न्यायालयीन प्रक्रियेद्वारे सत्य उजेडात येण्याची अपेक्षा आहे.


Leave a Reply