कालचा रविवार शिंदे सेनेसाठी “घातवार” ठरला असे दिसतेय. कारण राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना “महाराष्ट्राची विधानसभा खोक्या भाईंनी भरली आहे” असे विधान करून अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागले. आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी , खासकरून मुंबई आणि ठाण्यासाठी “विशेष केंद्रीय समिती” स्थापन करून मनसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर, “खोका’ किंवा “खोके” हा शब्द त्यांच्या नावाला चिकटला आहे, हे सर्वश्रुत आहे . शिंदे, हे त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये “भाई” या नावानेच ओळखले जातात. त्यामुळे “महाराष्ट्राची विधानसभा खोक्या भाईंनी भरली आहे” हे विधान कोणाला उद्देशून होते , हे ओळखण्याइतपत महाराष्ट्रातील जनता शहाणी आहे . त्यामुळे कुणाल कामरा प्रकरणी आक्रमक झालेल्या शिंदेसेनेने थोडे दमाने घ्यावे, असे सांगणारा एकही विचारी माणूस सध्या शिंदेंच्या आसपास नसणे. हीच मोठी शोकांतिका आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यापासून, एकनाथ शिंदे यांची हि अस्वस्थता कायम वाढताना दिसतेय. सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले फडणवीस, आपली उपमुख्यमंत्री म्हणून झालेली पदावनती कशी स्वीकारतात , हे शिंदे यांनी पाहिले आणि अनुभवले होते . पण स्वतःवर ती वेळ आल्यानंतर मात्र ते आपल्या चेहऱ्यावरचे भाव आणि संताप आवरू शकले नाहीत. तीन चार वेळा रुसून गावी जाणे झाले, अगदी अमित शाह यांच्यापर्यंत आपली नाराजी पोहचवण्याचा प्रयत्न करूनही पहिला, पण त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालेच नाही. पण तरीही त्यांचा “हट्ट”, खेळणे हातातून गेलेल्या मुलाप्रमाणे कमी होत नाही, उलट तो वाढतच चालला आहे. त्यामुळेच असेल कदाचित, ते विधिमंडळातही अनेकदा मुख्यमंत्री बोलल्यानंतर, बोलायला उठतात. खरेतर, एकदा मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले कि ते अंतिम असते. त्यानंतर अन्य मंत्र्यांनी न बोलण्याचा प्रघात नसताना, शिंदे प्रोटोकॉलची ऐशी तैशी करताना दिसले. विशेष म्हणजे, फडणवीस हे या गोष्टींकडे समजदारपणे पाहताना दिसताहेत. तरीही शिंदे यांच्या वर्तनात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर जी एक परिपक्वता येणे आवश्यक असते. ती मात्र दिसत नाही, याचे वाईट वाटते.
क्रिकेट आणि राजकारण “खेळणे” अनेक बाबतीत सारखेच आहे. ” क्रिकेटमध्ये प्रतिकूल स्थितीत खेळपट्टीवर टिकून राहणे, यातच फलंदाजाचे कौशल्य दडलेले असते. आणीबाणीच्या काळात डोके शांत न ठेवणारा खेळाडू फटकेबाजीच्या नादात, वाहवत जातो आणि आपली विकेट फेकतो”. महाराष्ट्राच्या राजकारणातील “खेळपट्टीवर” जास्त वेळ तग धरण्यासाठी एकनाथ शिंदे एक हाती प्रयत्न करतील, असे सुरुवातीला वाटत होते. पण शिंदे यांच्या आक्रमक राजकीय धोरणांकडे पाहताना, कुणाल कामरा प्रकरणी त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहताना, ते सुद्धा अशीच खेळी खेळण्याच्या घाईत असावेत असे दिसते. त्याचे कारणही तसेच आहे , आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीमध्ये ज्यांचा कोणत्याही क्षणी, कोणत्याही रूपात प्रवेश होऊ शकतो, अशा राज ठाकरे यांचे आव्हान शिंदे सेनेसमोर उभे राहू शकते. कारण उद्धव सेनेला मुंबईत ताकदीने प्रत्त्युत्तर देण्याचे काम फक्त राज करू शकतात. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदी राहूनही शिंदे आपला प्रभाव ठाण्याच्या पलीकडे वाढवू शकले नाहीत. संघटना वाढीसाठी जीवाचे रान करेल असा एकही नेता गेल्या तीन वर्षांत त्यांना मिळाला नाही. किंवा त्यांना निर्माण करता आला नाही. नव्याने उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी “ऑपरेशन टायगर” या नावाने उद्धव सेनेला फोडण्याचा महत्वाकांक्षी प्रयत्न केला होता. गाजावाजा खूप झाला , पण तो प्रयोग राजन साळवी या माजी आमदारांवरच थांबला. उद्धव ठाकरेंचा एकही आजी खासदार – आमदार त्यांना फोडणे शक्य झाले नाही. यातच “चित्र किती बदलले आहे ” हे त्यांनी समजून घेणे आवश्यक होते. पण तसे झाले नाही. आता विधिमंडळ अधिववेशन संपुष्टात येत असताना काल एकाच दिवशी राज ठाकरे आणि त्यानंतर कुणाल कामरा यांनी ज्या पद्धतीने शिंदे यांच्या एकूण राजकीय धोरणांची खिल्ली उडवली आहे. ती बाजू सावरून शिंदे सेनेने, कार्यकर्त्यांना शांत करत ,आपली संघटनात्मक चौकट बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता, कुणाल कामरा याच्या स्टुडिओवर हल्ला करणे, संजय निरुपम यांनी त्याची “धुलाई” करणार अशी धमकी देणे, कुणीही काहीही बोलणे यामुळे शिंदेसेनेची प्रतिमा चांगलीच डागाळली आहे. ती सावरणे हेच मोठे आव्हान आता शिंदे सेनेसमोर असणार आहे. उपमुख्यमंत्रीपदी बसलेल्या नेत्याकडून जेव्हा एखाद्या कवितेसाठी किंवा कलात्मक अभिव्यक्ती विरोधात बळाचा वापर केला जातो, त्यावेळी जनमानसात सरकार विरोधात वातावरण निर्मिती होते. त्यामुळे हि कार्यकर्त्यांची आगळीक नेत्याच्या अंगाशी येऊ शकते हे मागे छगन भुजबळ प्रकरणात महाराष्ट्राने पहिले आहे. त्यावेळी शिंदे साधे आमदारसुद्धा झाले नव्हते, त्यामुळे त्यांना ते प्रकरण माहिती असण्याची शक्यता कमीच. पण त्या घटनेत आणि शिंदे सेनेने कुणाल कामरा याच्या स्टुडिओवर हल्ला करणे यात मला तरी फारसा फरक दिसत नाही. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर भुजबळ यांनी पवारांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यांना गृहखात्याचा कार्यभार देऊन उपमुख्यमंत्री बनवण्यात आले. कोट्यवधी रुपयांच्या तेलगी बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यात भुजबळांवर आरोप झाल्यामुळे हा त्यांचा सर्वात वादग्रस्त कार्यकाळ होता. त्याच दरम्यान २००३ मध्ये झी अल्फा वृत्तवाहिनीवर एक विडंबनात्मक कार्यक्रम झाला होता. त्यात भुजबळांच्या पक्षांतरावर, बोलण्याच्या नाटकी पद्धतीवर गंमतीदार टिप्पणी करण्यात आल्यामुळे भुजबळांचे अनुयायी चिडले होते, त्यांनी थेट झी वृत्तवाहिनीच्या स्टुडिओवर हल्ला केला. त्याचे पडसाद देशभरात उमटले आणि त्यामुळे भुजबळांना राजीनामा द्यावा लागला होता . थोडक्यात सांगायचे तर, राजकारणाला कोणतेच कारण लागत नाही, येथे कोणती गोष्ट कधी अंगाशी येईल हे सांगता येत नाही. हे एकनाथ शिंदे यांना कळू नये याचे मात्र आश्चर्य वाटते. आणि आणखीन एका गोष्टीचे नवल वाटते, ते म्हणजे आज जे शिंदे अनुयायी कुणाल कामराच्या टीकेमुळे , भाषेमुळे अस्वस्थ झालेले दिसत आहेत. त्यातील अनेक नेते मनोज जरंगे पाटील हे जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी घाण भाषेत बोलत होते , त्यावेळी जरंगे पाटील याना जाहीरपणे भेटायला जात होते . त्यांच्याशी चर्चा करत होते. पण या शिंदे सेनेच्या नेत्यांनी किंवा खुद्द एकनाथ शिंदे यांनी एकदाही जरंगे पाटील यांच्या असभ्य भाषेविषयी नाराजी व्यक्त केलेली माझ्या तरी पाहण्यात आली नव्हती. खरेतर उपमुख्यमंत्री असणाऱ्या आपल्या सहकार्य विषयी एक आंदोलक अत्यंत आक्षेपार्ह्य भाषेत शिवीगाळ करतो , हि एक बाब त्या आंदोलकाला तुरुंगाची हवा दाखविण्यासाठी पुरेशी होती. पण त्यावेळेस शिंदे आणि त्यांचे सहकारी नेते मजा बघत होते…. पण आज फडणवीस मात्र तसे वागतील असे वाटत नाही. कुणालच्या या वक्तव्याचा निषेध झालाच पाहिजे. पण अशी वृत्ती का फोफावली याचाही विचार झाला पाहिजे असे वाटते.
महेश म्हात्रे
संपादक
महाराष्ट्र रिसर्च सेंटर
Leave a Reply