अहिल्यानगर : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी गावात पार पडणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीवर्षानिमित्त ही बैठक चौंडीत आयोजित करण्यात आली आहे. बहुतांश मंत्री अहिल्या नगर येथील शासकीय विश्रामगृहावर मुक्कामीसाठी पहिलंच आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसाठी चौंडीत विश्रांती कक्ष, दोन किमीवर वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारी 12.30 वाजता बैठकीला सुरुवात होईल. दोन तास बैठक चालणार आहे. दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टरने चौंडीत आगमन होईल. बैठकीसाठी साडेतीन हजार खुर्च्यांची व्यवस्था केली आहे. दरम्यान, चौंडी पासून दोन किमी अंतरावर सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागामार्फत 80.90 कोटी रुपयांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सुत गिरणीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
ही बैठक साधारण 3 तास चालणार आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत बैठक संपेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. या मंत्रिमंडळ बैठकीत चौंडी विकास आराखड्याला मूर्त स्वरूप देण्यासह चौंडीशी संबंधित अनेक महत्वाचे निर्णय होणार आहेत. बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंडपामध्ये फोटोंच्या माध्यमातून अहिल्यादेवींचा काळ उभा केला गेला आहे. यात अहिलेश्वर मंदिर, जुनी गढी, कौलारु घरे, बैलगाडीचे मोठो फोटो लावले आहेत. मंडपाच्या बाजूला मंत्री व व्हीआयपींच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. संपूर्ण हॉल वातानुकूलित करण्यात आला आहे. अग्निशमन च्या सात वाहने येथे असतील.
सभापती राम शिंदेंकडे नियोजन
बैठकीच्या नियोजनाची विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी पाहणी केली. चौंडी हे राम शिंदे यांचे घरच आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीसाठी आज घरी येणाऱ्या पाहुण्याचा राम शिंदे खास पाहुणचार करणार आहेत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री, प्रशासकीय अधिकारी, पोलिस बंदोबस्त राज्यातून येणारे आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जवळपास दोन ते तीन हजार व्यक्तींचा जेवणाचा बेत आखण्यात आला आहे. हा सर्व जेवणाचा खर्च राम शिंदे स्वत: करणार आहेत.
खास नगरी मेन्यू
चौंडीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी कर्जतची सुप्रसिद्ध शिपी आमटी, मासवडी, कोथिंबीर वडी, खवा पोळी, पुरणपोळी, थालीपीठ, पुलाव, कुरडई, हुरडा, शेंगोळे, वांग्याचे भरीत, डाळबट्टी, मटकी, मसाला वांगे, बाजरी भाकरी, आमरस-चपाती, हुलग्याचे शेंगोळे, आलू वडी, मूग भजी, शेवगा भाजी, ठेचा-भाकरी, म्हैसूर बौंडा, मांडे, बीट थालपीठ या महाराष्ट्रीयन मेन्यूचा समावेश आहे.
Leave a Reply