स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल टिपण्णी केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले आहे. न्यायालयाने राहुल गांधी यांना स्वातंत्र्यसैनिकांची खिल्ली उडवू नये असे म्हटले आहे. तुम्ही राजकारणी आहात, अशी बेजबाबदार विधाने करू नका.जर असे विधान पुन्हा केले गेले तर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल असेही सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना खडसावले.
न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधींचे वकील अभिषेक सिंघवी यांना विचारले की त्यांच्या अशिलाला माहित आहे का की, महात्मा गांधींनी ब्रिटिशांशी संवाद साधताना ‘तुमचा विश्वासू सेवक’ हे शब्द वापरले होते. त्यांच्या आजी इंदिरा गांधींनीही सावरकरांचे कौतुक करणारे पत्र पाठवले होते. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधींना सांगितले की, जर तुम्हाला इतिहास माहित असता तर तुम्ही सावरकरांबद्दल असे बेताल वक्तव्य केले नसते.
पुढे बोलताना न्यायालयाने म्हटलं की,महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांची पूजा केली जाते. राहुल गांधी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध वाईट बोलू शकत नाही. राहुल गांधींना नोटीस बजावताना न्यायालयाने म्हटले आहे की, त्यांनी यापुढे योग्य वर्तन करावे अन्यथा ते अडचणीत येतील. यासोबतच त्यांनी अशी विधाने का केली असा प्रश्नही विचारला. तथापि, वीर सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना दिलासा दिला आणि कनिष्ठ न्यायालयात त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या कार्यवाहीला स्थगिती दिली.
सावरकरांबद्दल राहुल गांधी काय म्हणाले होते?
राहुल गांधी यांनी १७ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत वीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. राहुल गांधी यांनी वीर सावरकरांचे इंग्रजांचे सेवक आणि पेन्शनधारक असे वर्णन केले होते. मॅजिस्ट्रेट कोर्टाने या प्रकरणात राहुल गांधींविरुद्ध समन्स जारी केले होते. या समन्सच्या विरोधात राहुल गांधींनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, अलाहाबाद उच्च न्यायालयाने समन्स रद्द करण्यास नकार दिला होता. यानंतर राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
Leave a Reply