फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेत झालेल्या भेटीनंतर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांच्यातील संवाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. या दोघांमध्ये नुकताच फोनवर संवाद झाला असून, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रातील सहकार्य यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.या संवादाची माहिती पंतप्रधान मोदींनी स्वतः एक्स वरून दिली. त्यांनी लिहिलं, “आज एलॉन मस्क यांच्याशी संवाद साधला. वॉशिंग्टन भेटीत चर्चिलेले मुद्दे आणि भारत-अमेरिका भागीदारीविषयी पुन्हा चर्चा झाली. नवोपक्रम व तंत्रज्ञान क्षेत्रात एकत्र काम करण्याची अफाट क्षमता असून, भारत यासाठी पूर्णपणे तयार आहे.”या चर्चेनंतर भारतात टेस्लाच्या गुंतवणुकीबाबत आणि रोजगारनिर्मितीच्या संधींविषयीची आशा अधिक बळकट झाली आहे. मोदी-मस्क यांचा हा संवाद दोन राष्ट्रांतील तंत्रज्ञान सहकार्याला नवी दिशा देणारा ठरू शकतो, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
फेब्रुवारी महिन्यात एलॉन मस्क आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाल्यानंतर, भारतामध्ये टेस्ला मोठ्या प्रमाणावर नोकरभरती करणार असल्याच्या चर्चा झपाट्याने पसरल्या. एलॉन मस्क यांच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार, त्यांनी कस्टमर सर्व्हिस आणि बॅकएंड विभागातील काही पदांसाठी भरती सुरू केली होती, यामध्ये मुंबई आणि दिल्ली या प्रमुख शहरांमध्ये भरती होणार असल्याचे नमूद होते.या घडामोडीनंतर मस्क यांच्या स्टारलिंक प्रकल्पाने भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या भारती एअरटेल आणि जिओसोबत करार केला. एअरटेलने आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, भारतातील ग्राहकांसाठी हाय-स्पीड इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी स्पेसएक्ससोबत ऐतिहासिक करार करण्यात आला आहे. हा भारतातील स्टारलिंकशी संबंधित पहिलाच करार असून, याअंतर्गत स्पेसएक्सला भारतात स्टारलिंकची उपकरणे विकण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे.
या दोन महत्त्वाच्या घडामोडींनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा एलॉन मस्क यांच्याशी थेट संवाद साधला. त्यामुळे आता उद्योगजगतात एलॉन मस्क लवकरच भारतात नवा उपक्रम सुरू करणार, किंवा टेस्लाची बहुचर्चित भारतात एन्ट्री अखेर निश्चित झाली असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
Leave a Reply