ठाणे शहरातील कोपरी परिसरातील बारा बंगला भागात ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शासकीय बंगल्यात बर्ड फ्लू चा संसर्ग आढळून आल्यानंतर ठाण्यात प्रचंड खळबळ माजली आहे. ही लागण आटोक्यात आणण्यासाठी नागरी अधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलली आहेत. ठाणे पोलिस आयुक्तांच्या शासकीय बंगल्यावर गायींचा गोठा आणि कोंबड्यांचे खुराडे आहेत. आशुतोष डुंबरे यांनी तेथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला सुद्धा लावला आहे. पण त्यामुळे ठाण्यातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याशिवाय या भागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या मोठमोठ्या बंगल्यामध्ये सुद्धा असेच कुक्कुट पालन, गोपालन शेतीचे प्रयोग केले जातात. डुंबरे यांच्या शासकीय घराच्या आवारात ठेवलेल्या कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे निश्चित झाल्यानंतर, ठाणे महापालिकेने कोपरीतील सर्व चिकन, मटण तसेच पोल्ट्री उत्पादनांची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.ठाणे महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जानेवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत (२१ दिवस) सर्व पोल्ट्री उत्पादनांची विक्री आणि दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात कोपरी भागातील संबंधितांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत.
बर्ड फ्लूची पुष्टी कशी झाली?
१४ जानेवारी रोजी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शासकीय बंगल्यातील दोन कोंबड्या मृतावस्थेत सापडल्या. पशु संवर्धन विभागाने या कोंबड्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवले. अहवालात या कोंबड्यांच्या मृत्यूला बर्ड फ्लू कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले.
ठाणे जिल्ह्याच्या संवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. वल्लभ जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय निवासस्थानाच्या १ किलोमीटरच्या परिघातील २१ कोंबड्या मारण्यात आल्या आहेत.
ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने जिल्हाधिकारी व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मदतीने आठ वेगवेगळ्या जलद प्रतिसाद पथकांची (रॅपिड रिस्पॉन्स टीम) स्थापना केली. या पथकांनी एकूण १२७ लोकांची तपासणी केली असून, ७५ नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. सुदैवाने, कोणालाही संसर्ग झाल्याचे आढळले नाही.
महापालिकेच्या आदेशानुसार, कोपरी परिसरातील ३१ कोंबडीची दुकाने आणि एका अंड्याचे दुकान बंद ठेवण्यात आले आहे. याशिवाय २१ कोंबड्या आणि २०० अंडी नष्ट करण्यात आली आहेत.
ठाणे महापालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.
Leave a Reply