केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांचे वेतन वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासोबतच भत्ते आणि माजी खासदारांचे पेन्शन देखील वाढवण्यात आले आहे. ही नवीन वेतनवाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार असून संसदीय कार्य मंत्रालयाने यासंदर्भातील अधिसूचना सोमवारी जारी केली आहे.
अधिसूचनेनुसार, लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांचे मासिक वेतन १ लाख रुपयांवरून थेट १.२४ लाख रुपये करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, संसदीय अधिवेशनाच्या वेळी मिळणारा दैनिक भत्ता २,००० रुपयांवरून २,५०० रुपये करण्यात आला आहे.
माजी खासदारांच्या पेन्शनमध्येही वाढ
सध्याचे माजी खासदारांचे पेन्शन २५,००० रुपयांनी वाढून ३१,००० रुपये प्रति महिना करण्यात आले आहे. तसेच, पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा दिलेल्या माजी खासदारांसाठी अतिरिक्त पेन्शन २,००० रुपयांवरून २,५०० रुपये करण्यात आली आहे. हा निर्णय संसदेतल्या बजेट सत्रादरम्यान घेण्यात आला आहे. याआधी एप्रिल २०१८ मध्ये वेतनवाढ करण्यात आली होती.
२०१८ च्या बदलानुसार खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील कामकाजासाठी ७०,००० रुपये, कार्यालयीन खर्चासाठी ६०,००० रुपये महिना, आणि संसदेच्या अधिवेशनाच्या काळात दैनिक २,००० रुपये भत्ता दिला जात होता. आता या भत्त्यांमध्येही वाढ करण्यात येणार आहे.
खासदारांना मिळणाऱ्या सुविधा कोणत्या?
याशिवाय खासदारांना अनेक विशेष सुविधा दिल्या जातात –
a) मोफत इंटरनेट आणि फोन सेवा
b) दरवर्षी ३४ वेळा मोफत डोमेस्टिक विमान प्रवासाची संधी
c) फर्स्ट क्लासने मोफत रेल्वे प्रवास
d) रस्त्याने प्रवास केल्यास इंधन खर्चाची भरपाई
e) दरवर्षी ५०,००० युनिट वीज आणि ४,००० किलोलीटर मोफत पाणी
निवासाची विशेष सुविधा
सरकार त्यांच्या राहण्याची देखील सोय करते. खासदारांना दिल्लीत कोणतेही भाडे न देता मोफत घर मिळते. त्यांना त्यांच्या ज्येष्ठतेवरून हॉस्टेलचे रुम, अपार्टमेंट किंवा बंगला दिला जाऊ शकतो. जे खासदार सरकारी निवासस्थान घेत नाहीत त्यांना दर महिन्याला घराचा भत्ता दिला जातो.
Leave a Reply