महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने मला हा सन्मान मिळाल्याचा मला अभिमान आहे. पुणेकर रसिकांनी मला आजवर भरभरून प्रेम दिले आहे, हे प्रेम मी कधीच विसरणार नाही. मी मिळवलेले प्रत्येक पुरस्कार जपून ठेवले असून, ते मला सतत ऊर्जा देतात, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.
स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगालॉज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘यशवंतराव चव्हाण कला आणि साहित्य पुरस्कार’ समारंभात सराफ यांना कै. प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ कला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते देण्यात आला. या सोहळ्याला प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या समारंभात विविध साहित्यिक पुरस्कारांनी मान्यवरांना गौरविण्यात आले.
• सुनीता झाडे (नागपूर) यांना ‘शब्दांच्या पसाऱ्यातील आत्महत्या’ या कवितासंग्रहासाठी कै. शिवाजीराव अमृतराव ढेरे स्मृत्यर्थ साहित्य पुरस्कार देण्यात आला.
• फेलिक्स डिसोजा (वसई) यांना ‘आरशात ऐकू येणार प्रेम’ या कवितासंग्रहासाठी कै. बाबासाहेब जाधव स्मृत्यर्थ साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
• सफर अली इसफ (वैभववाडी) यांना ‘अल्लाद ईश्वर’ या कवितासंग्रहासाठी कै. धनाजी जाधव स्मृत्यर्थ साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, लेखक प्रा. फ. मु. शिंदे, अशोक नायगावकर, ट्रस्टचे विजय ढेरे आणि संजय ढेरे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, गौरव फुटाणे, सचिन जाधव, कुणाल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी केले, तर सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले. यावेळी डॉ. मोहन आगाशे आणि नागराज मंजुळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
Leave a Reply