नक्षलवाद्यांच्या प्रभावाखालील जिल्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, केवळ सहा जिल्हे आता अत्यंत प्रभावित राहिले आहेत. एका वर्षाच्या आत भारत नक्षलमुक्त होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. त्यांनी याला नक्षलवादाच्या उच्चाटनाचा नवा टप्पा संबोधले असून, सरकार ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.
गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार, पूर्वी नक्षलवादाने प्रभावित ३८ जिल्ह्यांपैकी १२ जिल्हे सर्वाधिक धोकादायक होते. मात्र, आता ही संख्या निम्म्यावर आली आहे. त्याचबरोबर, कमी प्रभावित जिल्ह्यांची संख्या ९ वरून ६ पर्यंत खाली आली आहे, तर अन्य वामपंथी अतिरेक्यांच्या प्रभावाखाली असलेल्या जिल्ह्यांची संख्या १७ वरून ६ वर आली आहे.
सध्या नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित असलेल्या सहा जिल्ह्यांमध्ये छत्तीसगडचे विजापूर, कांकेर, नारायणपूर आणि सुकमा, झारखंडचा पश्चिम सिंहभूम आणि महाराष्ट्राचा गडचिरोली यांचा समावेश आहे. याशिवाय, आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू, मध्य प्रदेशातील बालाघाट, ओडिशातील कालाहंडी, कंधमाल आणि मलकानगिरी तसेच तेलंगणातील भद्राद्री-कोथागुडेम हे सर्वात कमी प्रभावित जिल्हे ठरले आहेत. अत्यल्प नक्षल प्रभाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये छत्तीसगडच्या दंतेवाडा, गरिआबंद आणि मोहला-मानपूर-अंबागड चौकी, झारखंडच्या लातेहार, ओडिशाच्या नुआपाडा आणि तेलंगणाच्या मुलुगु यांचा समावेश आहे.
अमित शहा यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनासाठी कठोर धोरण अवलंबत आहे. सुरक्षा शिबिरे वाढवली जात असून, प्रभावित भागांमध्ये रस्ते, वाहतूक, वीज, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांचा विकास वेगाने केला जात आहे. गेल्या वर्षभरात मिळालेले यश ही या धोरणाचीच फलश्रुती आहे.
Leave a Reply