सांगली : जिल्ह्यातील उबाठाचे पदाधिकारी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी मंत्री उदय सामंत, आमदार सुहास बाबर, शिवसेना सचिव राम रेपाळे, दिपाली सय्यद उपस्थित होते. चंद्रहार पाटील यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील पहिला हिंद केसरी संतोष आबा वेताळ, पैलवान विकास पाटील, सायगावचे उरसरपंच सागर वंजारी, सुरलीचे उपसरपंच कृष्णात भादणे, अमोल घोगे, सुशांत जाधव, संजय कांबळे, लक्ष्मण मंडळे यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी उबाठा सेनेत प्रवेश केला होता. त्याचं फळ म्हणून महाविकास आघाडीत बिघाडी करून उद्धव ठाकरे यांनी त्यांना सांगली लोकसभा निवडणुकीचं तिकीट दिलं. मात्र ते फारसी चांगली कामगिरी करू शकले नाही. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजयाचा झेंडा रोवला. त्यांना साथ मिळाली ती आमदार विश्वजित कदम यांची. तर चंद्रहार पाटील 60 हजार मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. महाविकास आघाडीने आपल्या विरुद्ध काम केल्याचा दावा करत अखेर त्यांनी उबाठा पक्षाची साथ सोडली शिंदेंच्या सेनेत प्रवेश केलाय.
चंद्रहार पाटील यांचे पक्षात स्वागत करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की नकली आखाड्यातून आज खऱ्या आखाड्यात आलात. पैलवान पाटील हे कुटील माणसाकडून स्वच्छ मनाच्या माणसाकडे आले आहेत. चंद्रहार पाटील यांनी मराठी मातीचा खेळ असलेल्या कुस्तीला लौकिक मिळवून दिला. पैलवान हे महाराष्ट्राचे वैभव आहे. मी जरी पैलवान नसलो तरी २०२२ मध्ये समोरच्या लोकांना चारीमुंड्या चीत केले. तेव्हा असे डावपेच टाकले की ते अद्याप उठले नाहीत. पैलवानांना डावपेच माहित असतात. कुस्तीला बळ देण्यासाठी त्याला राजकीय पाठिंबा आवश्यक आहे. चंद्रहार पाटील यांचा आखाडा मंत्री उदय सामंत यांनी बघितला आहे. चंद्रहार पाटील यांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
Leave a Reply