सोमवारी रात्री नागपूर शहरातील महाल भागात दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. या घटनेनंतर शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. दगडफेक, गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याने नागपूरमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं. मात्र, मंगळवारी सकाळपासून परिस्थिती नियंत्रणात आली असून, तणावपूर्ण शांतता आहे.
या हिंसाचारानंतर नागपूर पोलिसांनी कडक उपाययोजना राबवल्या आहेत. आतापर्यंत ८० जणांना ताब्यात घेण्यात आलं असून, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय शेजारील जिल्ह्यांतूनही अतिरिक्त पोलीस फौज मागवण्यात आली आहे. महाल आणि त्याच्या आसपासच्या संवेदनशील भागात विशेष लक्ष ठेवलं जात आहे.
रात्री झालेल्या दगडफेकीनंतर रस्त्यावर पडलेले दगड हटवण्यात आले आहेत. तसेच, ज्या गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाली होती, त्या गाड्यांनाही हटवण्यात आलं आहे. नागपुरातील वाहतूक सकाळपासून पूर्ववत सुरू झाली असून, शाळाही नेहमीप्रमाणे सुरु आहेत.
शहरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कोणतेही भडकावणारे संदेश फॉरवर्ड करू नयेत, अशा सूचना नागपूर पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या हिंसाचारात हल्लेखोरांचा सहभाग स्पष्ट करण्यासाठी CCTV फुटेजची तपासणी सुरू आहे. आतापर्यंत 80 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलं असून, संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. या दंगलीत ५० हून अधिक वाहनांचे नुकसान झाले असून, ५-६ गाड्यांना आगी लावल्याची माहिती समोर आली आहे.
सोमवारी संध्याकाळी शिवाजी चौक, महाल परिसर आणि चित्रा टॉकीज भागात मोठ्या प्रमाणावर दंगलीचा आगडोंब उसळला. बाहेरून आलेल्या जमावाने अचानक दगडफेक आणि तोडफोड सुरू केली, त्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र शहरात भीतीचं वातावरण तयार झालं होतं.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे घटनास्थळी भेट देणार असून, पुढील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. सध्या शहरात शांतता असून, प्रशासनाकडून नागरिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे.
Leave a Reply