कल्याण आंबिवली परिसरातील कुख्यात इराणी वस्तीतील एका गुन्हेगाराचा चेन्नई पोलिसांनी चकमकीत खात्मा केला. परराज्यात विमानाने जाऊन दरोडे टाकणाऱ्या टोळीतील जाफर गुलाम हुसेन इराणी या आरोपीला चेन्नई पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले, तर त्याचे साथीदार सलमान मेश्राम आणि अमजद इराणी गंभीर जखमी झाले आहेत.
इराणी वस्तीतील हे गुन्हेगार महाराष्ट्रातून इतर राज्यांत विमानाने प्रवास करून सोनसाखळी चोरी, दरोडे आणि घरफोड्या करत होते. काल चेन्नईमध्ये हे आरोपी तब्बल १० किलो सोनं लुटून पळ काढण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. या झटापटीत जाफर इराणी ठार केले, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले.
आंबिवलीतील इराणी वस्तीवर कारवाईचा इशारा
कल्याण-आंबिवली परिसरात इराणी वस्ती मोठ्या प्रमाणात असून, ती अनेक गुन्हेगारांचे माहेरघर म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र पोलिसांनी वारंवार कारवाई करून अनेक आरोपींना तुरुंगात पाठवले, मात्र हे गुन्हेगार परराज्यात जाऊन चोऱ्या करत असल्याचे उघड झाले आहे.आंबिवलीतील इराणी वस्तीतील वाढत्या गुन्हेगारीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारकडे सातत्याने मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर अटाळी गावातील प्रथमेश पाटील यांनी या वस्तीवर बुलडोझर चालवण्याची मागणी केली होती. अखेर, अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आंबिवली इराणी वस्तीतील सर्व गुन्हेगारांचा शोध घेऊन मोठ्या प्रमाणात कोंबिंग ऑपरेशन राबवले जाईल आणि लवकरच या वस्तीवर बुलडोझर चालवला जाईल, असा महत्त्वाचा इशारा दिला आहे.
Leave a Reply