न्यूयॉर्क/इस्लामाबाद: अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये एक नवीन नाट्यमय घडामोड समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्यात दोन्ही देशांतील दोन अत्यंत बुद्धिमान नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. हे नेते कोण, हे त्यांनी स्पष्ट केले नसले तरी, पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांना व्हाइट हाऊसमध्ये विशेष मेजवानी दिल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी केला.
याआधीही ट्रम्प यांनी ७ ते १० मे दरम्यान भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षात आपण मध्यस्थी केल्याचा दावा अनेकदा केला होता. आता त्यांनी या दोन नेत्यांच्या प्रयत्नांमुळेच संघर्ष थांबल्याचे म्हटले आहे. ट्रम्प म्हणाले की, “मुनीर स्वतः युद्धाच्या मैदानात उतरले नाहीत, पण त्यांचीही संघर्ष थांबवण्यास मदत झाली. मी मुनीर आणि नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो.”
दरम्यान, मुनीर यांनी ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या ॲना केली यांनी याची पुष्टी केली की, “मुनीर यांनी नोबेलसाठी ट्रम्प यांच्या नामांकनाची शिफारस केली होती, त्यानंतर ट्रम्प यांनी त्यांना व्हाईट हाऊसवर खास स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले होते.”
या मेजवानीमुळे मुनीर पाकिस्तानात ट्रोल होत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. पाकिस्तानी जनता दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करत असताना, देशाच्या लष्करप्रमुखांचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केले जात असल्याबद्दल त्यांच्यावर टीका होत आहे. जनरल मुनीर यांना “भुकेले आणि असहाय्य” दाखवण्यात आले आहे, असेही काही मीम्समध्ये म्हटले जात आहे.
Leave a Reply