ग्रामीण भागातील साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच मराठी साहित्य व संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या साहित्य व कला विचार मंचाच्या माध्यमातून वाडे तालुक्यातील अस्पी विद्यालय, उचाट येथे राज्यस्तरीय एकदिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या १९ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.
संस्थेचे हे पाचवे साहित्य संमेलन असून यावर्षीच्या संमेलनाचे अध्यक्षपद राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध साहित्यिक श्रीकांत पाटील यांना बहाल करण्यात आले आहे.
यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून केंद्रीय नियामक मंडळाच्या सदस्या ज्योतीताई ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. साहित्यिक सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे मुख्य संपादक महेश म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे संमेलनाला वैचारिक आणि प्रेरणादायी उंची प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे.
साहित्य व कला विचार मंचातर्फे आयोजित साहित्यकृती स्पर्धा २०२४ च्या विजेत्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभही या सोहळ्यात होणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या साहित्य संमेलनात संपूर्ण राज्यभरातून साहित्य व संस्कृतीशी संबंधित सारस्वत, साहित्यप्रेमी आणि लेखक सहभागी होणार आहेत. संमेलनाचा मुख्य आकर्षण ठरणार आहे शिक्षण महर्षी स्व. यशवंत मोरे स्मृती काव्य संमेलन. या काव्य संमेलनासाठी राज्यातील ३० निवडक कवींना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय, चर्चासत्रे, साहित्य परिसंवाद, पुस्तक प्रदर्शन, वाचन सत्र आणि विविध सर्जनशील उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
या साहित्य महोत्सवाचे संपूर्ण नियोजन व आयोजन रंगतदार प्रकाशनचे संपादक विजय जोगमार्गे आणि योगेश तुकाराम गोतारणे यांनी साहित्य व कला विचार मंचाच्या माध्यमातून केले आहे. या संमेलनामुळे ग्रामीण भागातील नवोदित लेखक, कवी, साहित्यिक यांना व्यासपीठ उपलब्ध होणार असून, ग्रामीण साहित्यिक चळवळीस नवा आयाम मिळणार आहे. साहित्य आणि संस्कृतीप्रेमींसाठी हा सोहळा नवी दृष्टी देणारा ठरेल, असा विश्वास डॉ किशोर डोहाळे यांनी व्यक्त केला आहे.

उचाट गावात रंगणार मराठी साहित्य संमेलनाचा महोत्सव
•
Please follow and like us:
Leave a Reply