उत्तराखंड मंत्रिमंडळाने समान नागरी कायद्याला (समान नागरी संहिता) मंजुरी दिली असून, या कायद्याच्या अंमलबजावणीची तारीख लवकरच निश्चित केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दिली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, समान नागरी कायदा लागू करण्यासाठीची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशिक्षणाची प्रक्रिया संपली असून, लवकरच कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.
मुख्यमंत्री धामी यांनी पुढे सांगितले की, मंत्रिमंडळ बैठकीत कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला असून, अंमलबजावणीची तारीख लवकरच घोषित केली जाईल.
डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते की, जानेवारी महिन्यात ‘समान नागरी कायदा’ लागू केला जाईल. २३ जानेवारीला होणाऱ्या नगरपालिका निवडणुकांचे आणि २५ जानेवारीला अपेक्षित निकालांचे पार्श्वभूमीवर सरकार प्रजासत्ताक दिनी कायद्याच्या अंमलबजावणीची घोषणा करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी असेही म्हटले की, समान नागरी कायद्यामुळे राज्यात मोठा सामाजिक बदल घडेल. २०२२च्या निवडणुकीत या कायद्याच्या अंमलबजावणीचे वचन देण्यात आले होते. सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत या कायद्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्यास मान्यता, अंमलबजावणीची तारीख लवकरच होणार जाहीर
•
Please follow and like us:
Leave a Reply