१९९६ साली अशोक मुळेंच्या संकल्पनेतून या साहित्य उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली त्या घटनेस आज ३० वर्षे झाली. अशोक मुळे विर्ले पार्ल्याहून वसईला आले. त्यांना वसईचा हरितस्पर्श झाला आणि वसईला मुळे यांचा साहित्यिक परिसस्पर्श! तोच परिसस्पर्श आज दिनांक १८ जानेवारी, २०२५ रोजी विशेषतः वसईकरांसाठी डिम्पलचे सुवर्णयुग घेऊन आला आहे. साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या लेझिम, ढोल ताशांच्या गजरात ग्रंथ दिंडीचे जल्लोषाच्या ठिकाणी मोठ्या दिमाखात आगमन झाले आणि जल्लोषाच्या उदघाटनाने सकाळचे पर्व सुरु झाले. दीप प्रज्वलन, मान्यवरांचे सत्कार इत्यादी सोपस्कार पार पडले. ग्रंथ प्रकाशन आणि पारितोषिक वितरण झाले. विद्यमान आमदार मा.सौ. स्नेहा दुबे यांनी भाषेच्या संवर्धना संदर्भात वाचनाचे महत्व अधोरेखित केले. डॉ. रवींद्र शोभणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर आपल्यावर आलेल्या जबाबदारीचा उहापोह केला. शेकडोंनी मराठी शाळा बंद पडत असताना इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा वाढताहेत याची सल त्यांनी बोलून दाखवली. या शाळा मराठी माणसांच्या मालकीच्या असल्याची खंत जास्त त्रासदायक आहे. या साठी आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. अगदी पहिल्या इयत्तेपासून मराठीचा आग्रह घरातूनच व्हायला हवा असे मत त्यांनी मांडले. दुसऱ्या सत्रात मराठी भाषेला अभिजात दर्जा आणि आपली जबाबदारी हा परिसंवाद झाला. ज्येष्ठ संपादक श्री. महेश म्हात्रे यांनी ठासून सांगितले की भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची हाक सर्वप्रथम मराठी वर्तमानपत्रातून दिली गेली! मराठी भाषेचे सत्व जणू काही भरलेला भाताचा दाणा आहे. परंतु आज मात्र ती तुसागत म्हणजे सत्व हरवलेल्या स्थितीत जाऊ पहात आहे. शिक्षकांचे वाचन चौफेर आणि विपुल असावे. अन्यथा आडात नाही तर पोहरात कुठून येणार? जर मराठी वाचनच होत नसेल तर मराठी लिहिणार कसे? त्यांनी इस्राईल येथे बघितलं की सर्व शिक्षण तेथील हिब्रू भाषेतच आहे. अभिजात दर्जा टिकून राहण्यासाठी मराठी भाषेत सर्व शिकवावे . भाषिक संवर्धन सर्व स्तरीय व्हावे! लेखकाने स्वतःच्या भाषेत व्यक्त झाले पाहीजे अशी प्रांजळ मते त्यांनी प्रभावीपणे मांडली. मराठी चित्रपट विकास मंडळाचे संचालक श्री.संजय पाटील यांनी आपली मते मांडताना म्हटले की शासन हे मातृपीठ आहे. लेखकाने वाचलं तरच समाज वाचेल! विश्वकोषाच्या नोंदी वाचल्या पाहिजेत. नियतकालिकं बंद झाली हे दुर्दैव! मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आग्रही भूमिका धरणे ही तुमची, आमची सर्वांची जबाबदारी आहे. मराठी एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष डॉ.प्रदीप सामंत यांच्या मते साहित्य जल्लोष ही चळवळ आहे. मातृभाषेत शिक्षण हा भवितव्याचा पाया असतो! मराठी हेच भारतीयत्व मना मनात बिंबले पाहीजे. इतर भाषेतील शब्दांचे अतिक्रमण मराठी भाषेला घातक आणि संवर्धनातील मोठा अडथळा आहे. ललित लेखिका राणी दुर्वे यांनी आपले विचार मांडताना मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकवून ठेवणे ही अभ्यासक, संशोधक, लेखक, वाचक सर्वांची जबाबदारी असल्याचे मत ठळकपणे स्पष्ट केले. माजी प्राचार्य फा. सॅबी कोरीया यांनी उपस्थितांच्या काळजातच हात घातला. त्यांनी भाषेवरील प्रेम व्यक्त करताना म्हटले की मराठी भाषा सर्वाना देणं हा माझा धर्म आहे.ही भाषा पुढे नेणे हे आपणां सर्वांचेच कर्तव्य आहे. या भाषेच्या संस्कृतीशी एकरूप व्हा! त्यांचे समारोपाचे वाक्य मनाला भिडणारे होते. त्यांनी अत्यंत प्रेमळपणे सांगितले की मित्रांनो, माझं रक्त, माझा श्वास मराठी आहे!
तिसऱ्या सत्रातील बहारदार कवी संमेलनानंतर चौथ्या अंतीम पर्वातील गर्जा महाराष्ट्र माझा हा कार्यक्रम अभूतपूर्व झाला! मूर्ती लहान पण आवाज महान असलेले डॉ. गणेश चंदनशिवे यांनी सादर केलेला पोवाड्याने सभागृह दणानून टाकले. भक्तीचा ध्यास आणि अध्यात्माचा श्वास असलेली दिंडी तरुणाईने सळसळत्या ऊर्जेने, मनोवेधक शिस्तबद्धतेने साकार केली आणि प्रत्यक्ष पंढरीचेच दर्शन घडवले. त्या सर्व गुणी कलाकारांना, अमित घरत, राजेश म्हात्रे या नृत्य दिग्दर्शकांना साष्टांग दंडवत! सर्व वाद्य वाजविण्यात तरबेज असलेल्या कलाकारांना प्रोत्साहित करणारे संयोजक विजय जाधव यांनी एकत्रित पेश केलेला लोकवाद्यांचा आविष्कार कान तृप्त करून गेला! या कार्यक्रमाची सांगता शिवराज्याभिषेक च्या देखाव्याने करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले! सूत्रसंचालक निलेश सावे, मकरंद सावे यांचे मनापासून कौतुक! या जल्लोषला सातत्याने सहकार्य करणारी वसई विरार महानगरपालिका, सर्व व्यवस्था बघणारे संदेशजी जाधव, प्रकाश वनमाळी, यंग मेन्स कॅथॉलिक असोसिएशन, माणिकपूर अध्यक्ष श्री मर्यान आल्मेडा, विनय डिमेलो यांचे प्रत्यक्ष योगदान फार मोलाचे आहे. साहित्याची ही सांस्कृतिक पर्वणी रसिकांना सतत लाभो हीच मनःपुर्वक सदिच्छा!
हेमंतकुमार मेस्त्री, मनोर.

वसईतील मराठी भाषेचा कुंभमेळा… साहित्य जल्लोष, २०२५.
•
Please follow and like us:
Leave a Reply