ते म्हणतात ना – नशिब कधी, कुठे आणि कसं पलटी मारेल, सांगता येत नाही! राजस्थानातील एका साध्या भाजीविक्रेत्याच्या आयुष्यात अगदी असाच चमत्कार घडला आहे. राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील कोटपुतली येथील भाजीविक्रेता अमित सेहरा यांनी पंजाब राज्य लॉटरी – दिवाळी बंपर २०२५ मध्ये तब्बल ११ कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. विशेष म्हणजे, हे तिकीट त्यांनी उधारीवर पैसे घेऊन विकत घेतले होते!
अमित यांनी पंजाबमधील भटींडा येथे असलेल्या एका दुकानातून लॉटरी तिकीट घेतले होते. त्यांचा मित्र मुकेश यांनी त्यांना तेव्हा पैसे उधार दिले होते. नशिबाच्या या खेळात तेच तिकीट आता अमित यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरले आहे. लॉटरीचा निकाल लागल्यानंतर अमित यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. ते म्हणाले, “माझ्याकडे तर चंदीगडला जाऊन बक्षीस घेण्याच्याही पुरेसे पैसे नव्हते. पण देवाने मला छप्परफाड बक्षीस दिलं आहे. हा देवाचा आशीर्वाद आहे.”
कोटपुतली येथे ठेल्यावर भाजी विकून उदरनिर्वाह करणारे अमित यांनी सांगितले की, “हे पैसे मी माझ्या दोन छोट्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार आहे. आणि ज्यांच्या कडून मी तिकीट घेण्यासाठी पैसे उधार घेतले होते, त्या मित्रा मुकेशला मी एक कोटी रुपये देणार आहे. कारण त्यानेच मला या संधीपर्यंत पोहोचवलं.” एका भाजीविक्रेत्याची ही गोष्ट आज संपूर्ण राज्यात प्रेरणादायी ठरली आहे – नशिबाने खरंच त्याचं आयुष्य बदलून टाकलं आहे!


Leave a Reply