विठुरायाच्या दर्शनासाठी नवविवाहितांना खास सवलत; रांग न लावता पहा श्रीरंग!

आता नव्याने लग्न झालेल्या जोडप्यांना विठुरायाचे थेट दर्शन मिळणार आहे! पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने ऐतिहासिक निर्णय घेतला असून, नवविवाहित जोडप्यांना रांगेत तिष्ठत उभे राहण्याची गरज भासणार नाही. या जोडप्यासोबत आणखी तीन जणांना थेट दर्शनाची संधी मिळणार आहे.
माघी यात्रेसाठी ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन पूर्णतः बंद राहणार असून, भाविकांना जलद दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहा पत्राशेड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. पंढरपूर शहरातील स्थानिक नागरिकांना सकाळी ६ ते ७ आणि रात्री १० ते १०.३० या वेळेत थेट दर्शनाची संधी मिळणार आहे. यापूर्वी ही वेळ सकाळी ६ ते ६.३० एवढीच होती, मात्र आता ती वाढवण्यात आली आहे.
दर्शनासाठी येणाऱ्या अंध, दिव्यांग, अतिवृद्ध आणि चालता न येणाऱ्या भाविकांसाठी व्हीलचेअर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, दर्शन रांगेत भाविकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत आणि मृतदेह गावापर्यंत पोहोचवण्याचा खर्च मंदिर समिती उचलणार आहे.
माघी, आषाढी आणि कार्तिकी वारीत भाविकांसाठी नव्या सुविधा दिल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *