मुंबई: लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे आणि त्याचे रक्षण होणे आवश्यक आहे. मात्र त्याचबरोबर समाजाच्या आस्थेचाही विषय महत्त्वाचा आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरखान्यांबाबत दोन्ही गोष्टींचा विचार करूनच मार्ग काढू, असे स्पष्ट केले. तसेच, कबुतरांसाठी मानवी वस्ती नसलेल्या ठिकाणी खाद्य देणे किंवा ‘कंट्रोल फिडिंग’ यांसारख्या पर्यायांचा वापर करता येऊ शकतो, असेही त्यांनी सुचवले.
११ ऑगस्ट रोजी काही महापालिकांनी मांसाहारावर बंदीचा निर्णय घेतला. या निर्णयावर बोलताना फडणवीस म्हणाले की, हा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला नसून, १९९९ सालीच तो घेण्यात आला होता. इतकंच नाही, तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही हा निर्णय घेण्यात आला होता. महापालिका आयुक्तांकडून माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय १९९९ सालचा असल्याचे मला समजले, असेही त्यांनी सांगितले.
‘हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न’
काही लोक महापालिका निवडणुका जवळ आल्याने अशा मुद्द्यांचा वापर करून समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली. ‘महाराष्ट्र मजबूत आहे आणि अशा गोष्टींनी तो हलणार नाही’, असेही ते म्हणाले. मुंबईची प्रवृत्ती भांडण लावण्याची नाही. महाराष्ट्रात काहीतरी घडेल असा विचार कोणी करू नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
‘सरकारला खाण्यापिण्यामध्ये रस नाही’
सरकारला कोणी काय खावे हे ठरविण्यात कोणताही रस नाही. काही लोक तर शाकाहारींना ‘नपुंसक’ म्हणत आहेत. हा मूर्खपणा बंद करावा, अशी टीकाही त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली.
Leave a Reply