राज्याचे मंत्री नितेश राणे गेल्या काही महिन्यांपासून मुस्लीम समाजाबाबत सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा बुरख्याबाबत केलेल्या विधानामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे. ”नितेश राणे यांची बेजबाबदार विधाने महाराष्ट्र सरकारच्या प्रतिमेला तडा देत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या तत्त्वावर काम करत आहेत. अशा वेळी मंत्र्यांनी जबाबदारीने बोलायला हवे. त्यांच्या वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होत आहे, असे प्यारे खान यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांत हलाल मटण आणि मल्हार मटण सर्टिफिकेट प्रकरणावरून मोठा वाद झाला. त्यानंतर औरंगजेब प्रकरणावर नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची राज्य अल्पसंख्याक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.
पंतप्रधानांकडे थेट तक्रार दाखल करण्याचा इशारा
नागपूरसह महाराष्ट्रभरातून नितेश राणे यांच्या मुस्लीम समाजावरील वक्तव्यांच्या अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. यामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होत आहे. अशा वक्तव्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार करणार आहोत,” असे प्यारे खान यांनी जाहीर केले. दरम्यान, अमरावतीच्या अचलपूर येथे नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी झालेल्या हिंदू जन आक्रोश सभेत त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावणे, भारतीय दंड संहिता कलम 196 आणि 3 (5) अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
इमरान खान असलंम खान यांनी अचलपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आमदार नितेश राणे यांच्यासह सागर भैय्या बेग आणि कोपरगाव येथील आणखी एका व्यक्तीवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Leave a Reply